मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांसाठी अतिशय अटीतटीची लढत झाली. मात्र मुंबईकरांनी आपले मतांचे दान हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसच्या पारड्यात टाकले. मुंबईतल्या उत्कंठावर्धक आणि रोमहर्षक निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महाविकास आघाडीने जोरदार ताकद दाखवत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुतीचा धुव्वा उडवला.
महाविकास आघाडीला 4 जागा मिळाल्या आहेत तर महायुतीला मुंबईतल्या केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले. उद्धव ठाकरे यांनी 3, शिवसेना शिंदे गट 1 तर काँग्रेस 1 जागा असा विजय मिळविला आहे.
भाजप आणि महायुतीने मुंबईवर जास्त लक्ष दिले होते. मुंबईतील सहाही जागा जिंकण्याचे महायुतीचे लक्ष्य होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तीन दिवसांत दोनदा मुंबईला भेट दिली होती. मात्र त्याचा फारसा परिणाम मुंबईकर मतदारांवर झाल्याचे दिसून आले नाही.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. अरविंद सावंत यांनी येथून आपल्या निकटच्या प्रतिनिधी आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांचा पराभव केला आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी महत्त्वाच्या असलेल्या मुंबई दक्षिण मध्यमधून ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांनी विजय प्राप्त करत शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांचा पराभव केला आहे.
भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवत भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा धक्कादायक पराभव केला. भाजपने या मतदारसंघातून पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारत निकम यांना संधी दिली होती.
तर काँग्रेसमध्ये उत्तर मध्य मतदारसंघासाठी उमेदवारीचा घोळ कायम होता. शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळालेल्या वर्षा गायकवाड यांनी जोरदार प्रचार केला. मतमोजणीत दुपारपर्यंत भाजपचे निकम हे 50 हजाराहून अधिक मतांनी आघाडीवर होते. मात्र, ही हजारो मतांची पिछाडी भरून काढत वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला आहे.
भाजपसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबई उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबईत भाजपला 2009नंतर पुन्हा पराभव स्वीकारावा लागला आहे. येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी भाजपचे उमेदवार आणि मुलुंडचे विद्यमान आमदार मिहीर कोटेचा यांचा पराभव केला.
शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात अतिशय अटीतटीची लढत झाली. शिवसेना शिंदे गटाचे रविंद्र वायकर आणि ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांच्यातील लढत अतिशय उत्कंठावर्धक झाली. सुरुवातीला अमोल कीर्तिकर यांनी निर्णायक आघाडी घेत विजय मिळविला. मात्र रविंद्र वायकर यांनी फेरमोजणीची मागणी केली. त्यात रविंद्र वायकर यांनी केवळ 48 मतांची आघाडी घेत विजय मिळविला आहे.
हेही वाचा