दादरमधील रानडे मार्गावरील चांगल्या दर्जाचे पेव्हरब्लॉक काढून त्याऐवजी बसवण्यात आलेले ठोकळेवजा पेव्हरब्लॉक हे पादचारी आणि स्थानिक दुकानदारांची चांगलीच डोकदुखी ठरली आहे. अवघ्या सहा ते सात महिन्यापूर्वी दादरच्या सुविधापासून ते एन. सी. केळकर मार्ग सिग्नलपर्यंत दोन्ही बाजूच्या पदपथावर हे नव्याने पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहेत. परंतु हे पेव्हरब्लॉक योग्यप्रकारे न बसवल्यामुळे पादचाऱ्यांना धडपडत कायम साष्टांग नमस्कार घालावा लागत आहे.
जी/उत्तर विभागातील रानडे मार्गाची दक्षिण बाजू अर्थात फर्स्ट क्लास शॉप ते एन. सी. केळकर रोड, नक्षत्र मॉलजवळची पदपथ आणि रानडे मार्गावरील उत्तर बाजू अर्थात सुविधा शोरुम ते एन. सी. केळकर रोड सिग्नल येथील पदपथाची दुरुस्ती करण्यासाठी मागील वर्षी कार्यादेश देण्यात आले होते. परंतु कार्यादेश दिल्यानंतर एका बाजुला पावसाळ्यापूर्वी तर दुसऱ्या बाजुला मागील काही महिन्यांपूर्वी लाद्या बसवण्याचे काम पूर्ण झाले. दोन्ही बाजूंच्या पदपथासाठी अनुक्रमे 13 लाख 65 हजार आणि 12 लाख 79 हजार रुपयांची कंत्राट कामे के. आर. एजन्सी या कंपनीला देण्यात आले होते. परंतु वर्षाच्या आतच या पेव्हर ब्लॉक निखळल्याने पादचाऱ्यांना चालण्यास योग्य पायवाट मिळण्याऐवजी त्यावरून चालणेच डोकेदुखी ठरू लागले आहेत.
[ही बातमी सुद्धा वाचा - टॅक्सी गेली पालिकेच्या खड्यात]
स्थानिक दुकानदार आणि फेरीवाल्यांच्या मते पदपथाची कामे करतानाच ती योग्यप्रकारे न केल्यामुळे अनेक ठिकाणी पेव्हरब्लॉकचे उंचवटे तयार झाले आहेत, तर काही ठिकाणी ते उखडले गेले आहेत.