Advertisement

वीज पुरवठा खंडीत कसा झाला? चौकशी करणार- नितीन राऊत

वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर ज्या कारणांमुळं तांत्रिक बिघाड झाला आहे, त्याची चौकशी करण्यात येईल, असं आश्वासनही राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलं.

वीज पुरवठा खंडीत कसा झाला? चौकशी करणार- नितीन राऊत
SHARES

मुंबईतील बहुतांश भागातील वीज पुरवठा सुरळीत झाला असून उर्वरीत भागातील वीज पुरवठाही लवकरच पूर्ववत करण्यात येईल. वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर ज्या कारणांमुळं तांत्रिक बिघाड झाला आहे, त्याची चौकशी करण्यात येईल, असं आश्वासनही राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलं.

महावितरणच्या कळवा येथील सब स्टेशनमधील यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे संपूर्ण मुंबई महानगरातील वीजपुरवठा सोमवारी सकाळी अचानक खंडित झाला होता. मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला. पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने लोकल ट्रॅकवरच उभ्या राहिल्या. यामुळे प्रवाशांना नाईलाजाने ट्रॅकवर उतरुन पायी प्रवास करावा लागला, रस्त्यांवरील सिंग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला, रुग्णालयातील वीजही गेल्याने रुग्णांचे हाल झाले. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या.  

हेही वाचा- राज्य सरकार नियोजन शून्य, भाजपची टीका

Advertisement

महापारेषणच्या कळवा- पडघा GIS केंद्रात सर्किट एकच्या देखभाल-दुरूस्तीचं काम सुरू होतं. यावेळी सर्व भार हा सर्किट २ वर होता. त्यातच सर्किट २ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाण्यातील बहुतांश भाग यामुळे प्रभावीत झाला. मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या कळवा- पडघा, खारघर लाइन्स आणि ट्रान्सफाॅर्मर मल्टिपल ट्रिपिंग झाले. मुंबई-उपनगराचा सुमारे २ हजार २०० मेगावॅट वीज पुरवठा बाधित झाला. उरण वायू विद्युत केंद्राचे सर्व संच ट्रिप झाले. खारघर-तळोजा लाइन ट्रिप झाली होती, ती पूर्ववत करण्यात आली आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज अधिकारी युद्धस्तरावर प्रयत्न करत आहेत. मुंबई लोकल आणि रुग्णालयांमध्ये वीज पूर्ववत करण्यासाठी आमचं पहिलं प्राधान्य असेल, असं याबाबतची माहिती देताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं. 

Advertisement

दरम्यान, मुंबईतील वीज पुरवठा खंडीत झाल्याच्या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी बैठक बोलावली असून या बैठकीत उर्जामंत्री नितीन राऊत, उर्जा राज्यमंत्री प्रसाद तनपुरे, उर्जा सचिव असीम गुप्ता सहभागी होणार आहेत. या बैठकीत वीज पुरवठा कशामुळे खंडीत झाला? दुरुस्तीचं काम कुठवर आलं? या सगळ्याचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत. सोबतच भविष्यात असा बिघाड पुन्हा होऊ नये म्हणून करायचा उपाययोजनांचीही माहिती घेणार आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा