एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीच्या प्रकरणानंतर पश्चिम रेल्वेनं प्रवाशांना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्थानकांच्या पायऱ्यांवर मराठीतून दिलेल्या संदेशातून मराठी भाषेची चांगलीच वाट लावली होती. मात्र रेल्वेच्या या मराठी भाषेच्या अज्ञानावरून टीकाही झाली. पण त्यानंतरही त्यांच्यात काही सुधारणा झालेली नसून आता पुन्हा एकदा त्यांनी मराठी भाषेचं अज्ञान दाखवून दिलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर उपलब्ध करून दिलेल्या वायफाय सेवेची माहिती देण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकावर 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी' लिहिण्याऐवजी सीएसटी असा उल्लेख केलाच आहेत. त्यातच मिळवा ऐवजी चक्क मिलवा असं लिहून पुन्हा एकदा रेल्वेनं आपल्याला मराठी भाषा येत नसल्याचं दाखवून दिलं आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनसचं नाव आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, असं करण्यात आलं. रेल्वे प्रशासनाने शिवाजी महाराजांच्या नावापुढे महाराज असं नाव लिहून तसा बदल रेल्वे स्थानकाच्या पाट्यांमध्येही केला. परंतु, अजूनही रेल्वे प्रशासनाकडून सीएसएमटी या नावाचा उल्लेख पूर्णपणे केला जात नसल्याची खात्री आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस शेजारी आणि टाईम्स ऑफ इंडियाच्या इमारतीसमोरील बस स्थानकावर लावलेल्या फलकावरून लक्षात येतं.
या बस स्थानकावर ‘सीएसटी स्टेशनवर जलद, मोफत वायफाय मिलवा’ असा संदेश देणारा फलक लावला आहे. या फलकामध्ये स्थानकाच्या नावात महाराजांच्या नावाचा उल्लेख असल्यामुळे ते सीएसएमटी असं लिहिणं अपेक्षित होतं. परंतु, ते जुन्याच नावाप्रमाणं लिहून त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केलाच आहे. त्यातच मराठी अशुद्ध भाषेत लिहून मिळवा ऐवजी मिलवा असं हिंदी भाषेत लिहून मराठी भाषेचीही वाट लावून टाकली आहे.
यापूर्वी एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर पश्चिम रेल्वेनं प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्थानकांवरील पायऱ्यांवर संदेश देणारे स्टीकर चिकटवण्यात आले होते. यामध्ये त्यांनी ‘कृपया लहान चेंडू घेऊ नका’, ‘ कृपया हँड्राईल धरून ठेवा’, ‘कृपया एक पाऊल वगळू नका’ असा संदेश दिला होता. इंग्रजीतील शब्दांचा गुगलमध्ये टाकून मराठी भाषांतर करत लावलेल्या या संदेशातून रेल्वेने मराठीची तर पुरती वाटच लावली होती. परंतु त्याबरोबरच त्यांना नक्की काय संदेश द्यायचा हेच कळत नसल्यामुळे प्रवाशीही गोंधळात पडले होते. आता पुन्हा त्यांनी मिळवाचं ‘मिलवा’ करून मराठी भाषेची वाट लावली आहे.