कोरोना बाधित रुग्णांना लवकरात लवकर आणि सुस्वच्छ ठिकाणी उपचार मिळावेत, यासाठी काही दिवसांपूर्वी पालिकेने ‘वॉर्ड वॉर रूम’ची स्थापना केली. या ‘वॉर्ड वॉर रूम’मुळे मागील काही दिवसात रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सिजन पुरवठा, अतिदक्षता उपचार न मिळणे या सारख्या तक्रारीची संख्या आता कमी झाल्या आहेत. पालिकेने सर्व २४ विभाग कार्यालयांच्या पातळीवर वॉर्ड वॉर रूम्स म्हणजे विभागीय नियंत्रण कक्ष कार्यान्वित केल्याने मागील काही दिवसांपासून रुग्णांवर जलदगतीने उपचार होत असून कोरोना बाधित रुग्णांवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
कोविड १९ संसर्गाचे प्रमाण मुंबईत दिवसेंदिवस वाढत होते. अशाने आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण होऊ लागला होता. त्या अनुषंगाने पालिकेने सर्व उपाय योजना टप्या टप्याने पुरवली. तर रुग्णांवर उपचार केंद्रांची संख्याही प्रशासनाने वाढवली. असे असले तरी, रुग्णाला वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी या वारंवार येत होत्या, पालिकेच्या मदतसेवा दूरध्वनी क्रमांक १९१६ वर मुंबईभरातून मोठ्या संख्येने येणाऱ्या दूरध्वनींमुळे सर्वांना समाधानकारक प्रतिसाद देताना, पालिका थोडा वेळ लागत असल्याचे लक्षात आल्यानंतर महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी या कामाचे विकेंद्रिकरण करण्याचा तातडीने निर्णय घेतला. (Decentralized Hospital Bed Management) अशा स्वरुपात पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांच्या पातळीवर वॉर्ड वॉर रूम्स म्हणजे विभागीय नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.
वॉर्ड वॉर रूम सुरु करतानाच, दुसऱया बाजूला सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना दररोजच्या कोरोना चाचण्यांचे अहवाल विनाविलंब महानगरपालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडे सादर करण्याचेही निर्देश महानगरपालिका आयुक्त चहल यांनी दिले. दैनंदिन कोरोना बाधितांचे अहवालांची माहिती लवकरात लवकर कळू लागली. त्या रुग्णांची २४ यादी बनवून त्या त्या वॉर्ड वॉर रुमकडे सुपूर्द केली गेली. वॉर्ड वॉर रुममध्ये नियुक्त डॉक्टर्स आपापल्या विभागातील बाधित रुग्णांशी तातडीने संपर्क व सुसंवाद साधून त्यांना गरजेनुसार व योग्य ठिकाणी रुग्णापर्यंत पोहचून त्यांना वेळीच उपचार देऊ लागले. तातडीने प्रशासनाने पाऊले उचलल्यामुळे रुग्णांच्या मनातील भिती आणि गैरसमज सारखे प्रकार थांबले, वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून रुग्णशय्या नेमून देणे, व्याप्त व उपलब्ध रुग्णशय्यांची माहिती सातत्याने अद्ययावत करणे ही कामेदेखील तातडीने होवू लागली. त्यामुळेच मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांवर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे सांगितले जात आहे.
सध्या मुंबईतील विविध रुग्णालये व कोरोना काळजी केंद्र (२) मिळून १८ हजार ७४४ खाटांची क्षमता आहे. पैकी १२ हजार १२१ व्याप्त आहेत. तर तब्बल ६ हजार ६२३ उपलब्ध म्हणजे रिकाम्या आहेत. यामध्ये विविध समर्पित कोरोना रुग्णालये व समर्पित कोरोना उपचार केंद्र यांतील खाटांची एकूण क्षमता १२ हजार ४७८ इतकी आहे. पैकी ९ हजार २९९ व्याप्त असून ३ हजार १७९ उपलब्ध आहेत. ठिकठिकाणचे कोरोना काळजी केंद्र २ (सीसीसी २) मिळून सध्या ६ हजार २६६ खाटा उपलब्ध आहेत. ताज्या आकडेवारीनुसार यातील २ हजार ८२२ व्याप्त असून त्यापेक्षा अधिक म्हणजे ३ हजार ४४४ उपलब्ध आहेत. ऑक्सिजन पुरवठ्यासह उपचारांची सोय असलेल्या ७ हजार ७०५ रुग्णशय्यांपैकी ५ हजार ९८५ व्याप्त आहेत, तर १ हजार ७२० उपलब्ध आहेत. अतिदक्षता उपचारांचा विचार करता, १ हजार ३९४ पैकी १ हजार २९० रुग्णशय्यांवर उपचार सुरु असून १०४ बेड उपलब्ध आहेत. तर जीवरक्षक प्रणालीसह उपलब्ध असलेल्या ७७० खाटांपैकी ७४४ व्याप्त असून २६ उपलब्ध आहेत.
याशिवाय, ठिकठिकाणी मिळून ३२४ कोरोना काळजी केंद्र १ (सीसीसी १) तयार करण्यात आले आहेत, ज्यामध्ये बाधितांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तिंना अलगीकरण (क्वारंटाईन) करण्यात येते. या केंद्रांची मिळून एकूण क्षमता ४८ हजार ६४० आहे. मात्र सध्या १६ हजार ३५६ व्यक्ती या केंद्रांमध्ये असून ३२ हजार २८४ जणांना सामावून घेण्याची क्षमता उपलब्ध आहे. या आकडेवारीवर नजर टाकल्यानंतर स्पष्ट होते की, सर्व रुग्णालये व केंद्रांमध्ये पुरेशा संख्येने बेड उपलब्ध असून रुग्णांनी व जनतेनेही अनावश्यक भीती बाळगून घाबरुन जाण्याचे कारण नाही. असे आवाहन पालिकेकडून करण्यात आलेले आहे.
विभागीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.
ए विभाग २२७० ०००७, बी विभाग २३७५ ९०२३, सी विभाग २२१९ ७३३१, डी विभाग २३८३५००४, ई विभाग २३०० ०१५०, एफ/दक्षिण विभाग २४१७ ७५०७, एफ/उत्तर विभाग २४०११३८०, जी/दक्षिण विभाग २४२१ ९५१५, जी/उत्तर विभाग २४२१ ०४४१. एच/पूर्व विभाग २६६३ ५४००, एच/पश्चिम विभाग २६४४ ०१२१, के/पूर्व विभाग २६८४ ७०००, के/पश्चिम विभाग २६२० ८३८८, पी/दक्षिण विभाग २८७८ ०००८, पी/उत्तर विभाग २८४४ ०००१, आर/दक्षिण विभाग २८०५ ४७८८, आर/उत्तर विभाग २८९४ ७३५०, आर/मध्य विभाग २८९४ ७३६०. एल विभाग २६५० ९९०१, एम/पूर्व विभाग २५५२ ६३०१, एम/पश्चिम विभाग २५२८ ४०००, एन विभाग २१०१ ०२०१, एस विभाग २५९५ ४०००, टी विभाग २५६९ ४०००.