मुंबईत यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान खात्यानुसार (IMD), मुंबईत आज सकाळी पारा 13.8 अंशावर पोहोचला आहे. हे यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात निच्चांकी तापमान आहे.
मुंबईत 15 ते 17 जानेवारी दरम्यान थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने गेल्या आठवड्यामध्ये वर्तवला होता. त्यानुसार, मुंबईतील तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे.
मुंबईत रविवारी दिवसाच्या कमाल तापमानामध्येही घट झाली आहे. रविवारी कमाल तापमान 26.2 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. हे तापमान सामान्य तापमानापेक्षा पाच अंश कमी आहे. या हिवाळ्यात आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान 25 डिसेंबर रोजी 15 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. त्यानंतर आज 13.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 322 वर होता. तर दिल्लीतील सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 221 वर बघायला मिळालं.
राजधानी दिल्लीपेक्षा मुंबईतील हवा अधिक खराब झाल्याचं आकडेवारीवरुन दिसतेय. पुढील काही दिवसात मुंबईच्या हवेची पातळी सुधारली नाही, तर आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढू शकते.