मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल ट्रेन सोबतच इतर दैनंदिन व्यवहार सुरू होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवा, कार्यालये आणि १ जानेवारीपासून शाळा सुरू करता येऊ शकेल, असा विश्वास टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने (TIFR) व्यक्त केला आहे. यासंदर्भातील एक अहवालच संस्थेने मुंबई महापालिकेला सोपवला आहे. (Mumbai local train and offices can start from 1st November and schools from 1st January TIFR submits report to bmc)
काय सांगतो अहवाल?
टीआयएफआरने कोविड-१९ चा गणितीय दृष्टकोनातून अभ्यासकरून हा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार मुंबई शहरातील दैनंदिन व्यवहार ३० टक्क्यांपर्यंत सुरू करता येऊ शकतील. ऑक्टोबरमध्ये ही क्षमता ५० टक्क्यापर्यंत वाढवता येऊ शकते. त्यानंतर १ नोव्हेंबरपासून संपूर्ण शहराचं जनजीवन पूर्णपणे सुरू करता येऊ शकतं. त्यातही प्रामुख्याने अटी आणि शर्तींच्या आधारे शहरातील कार्यालये आणि सार्वजनिक वाहतूक सेवा सर्वांसाठी सुरू करता येईल. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे, तोंडाला मास्क लावणे, हातांची स्वच्छता राखणे, गाड्या-कामाच्या ठिकाणाचं नियमितपणे निर्जंतुकीकरण करणे, या गोष्टी बंधनकारक असतील, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
हेही वाचा- १२ सप्टेंबरपासून आणखी विशेष ट्रेन्स, सणासुदीसाठी रेल्वेचा मोठा निर्णय
शाळा सुरू करता येतील
शाळांच्या बाबतीतही या अहवालात महत्त्वाची बाब नमूद करण्यात आली आहे. इतर सर्व व्यवहार नियंत्रणात सुरू झाल्यानंतर सर्व गोष्टींचा आढावा घेऊन १ जानेवारी २०२१ पासून शाळा देखील सुरू करण्याची शिफारस स्कूल ऑफ टेक्नोलॉजी अॅण्ड कॉम्प्यूटर सायन्सचे संचालक संदीप जुनेजा यांनी प्रल्हाद हर्षा व रामप्रसाद सप्तर्षी यांनी आपल्या अहवालातून केली आहे.
कोरोनाची दुसरी लाट
या अहवालात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबद्दलही भाकीत करण्यात आलं आहे. ज्याप्रकारे मे-जूनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले होते. त्याच सप्टेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. हार्ड इम्युनिटीच्या टीमने म्ह्टलं आहे की, यावर्षी डिसेंबर किंवा पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत जवळजवळ ७५ टक्के झोपडपट्टी परिसरातील लोकांमध्ये तर अन्य भागातील ५० टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार होतील. या अहवालात मागील १५ दिवसांमध्ये जागतिक संस्थेच्या इशाऱ्या संदर्भात मात्र कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही.
कोरोनामुळे बिघडलेली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्रासह सर्वच राज्ये आपापल्या परिने प्रयत्न करत आहेत. देशाची आर्थिक राजधानी पूर्वपदावर कधी येते, याचीही सर्वांना प्रतिक्षा लागलेली आहे. अशा स्थितीत टीआयएफआरचा अहवाल सगळ्यांसाठी आशादायीच म्हणावा लागेल.