Advertisement

महापौरांनी घेतली समिती अध्यक्षांची झाडाझडती; अचानक दिली भेट

महापौरांनी त्यानंतर स्थापत्य समिती (उपनगरे), बाजार व उद्यान समिती, विधी समिती आणि शिक्षण समिती, आरोग्य समिती, महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षांच्या दालनाला भेट दिली. या चारही समित्यांचे अध्यक्ष दालनात उपस्थित नव्हते.

महापौरांनी घेतली समिती अध्यक्षांची झाडाझडती; अचानक दिली भेट
SHARES

 शिक्षकी पेशा असल्याने शाळांमधील वर्गांवर अचानक भेटी घेऊन मुलांची झाडाझडती महापौर विश्वनाथ महाडेश्वर घेत असतात. पण अाता त्यांनी गुरूवारी अशाचप्रकारे सर्व समिती अध्यक्षांच्या दालनांमध्ये अचानक भेट देऊन दांडीबहाद्दर अध्यक्षांचीच झाडाझडती घेतली. महापौरांच्या या अचानक पाहणीमध्ये सभागृहनेत्या, उद्यान व बाजार समिती अध्यक्ष आणि स्थापत्य समिती शहर समिती अध्यक्ष सोडले तर एकही अध्यक्ष कार्यालयांमध्ये दिसून आले नाहीत.  अचानक घेतलेल्या या भेटीत महापौरांनी कर्मचाऱ्यांचीच शाळा घेतल्यामुळे उत्तरं देताना त्यांची पार भंबेरी उडाली.


सुधार समिती अध्यक्ष गैरहजर

ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशीच समिती अध्यक्ष काय करत आहेत, ते कार्यालयांमध्ये उपस्थित आहेत का यासाठी अचानक भेट देऊन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची सर्वांचाच समाचार घेतला. महापौरांनी प्रारंभीच जुन्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांच्या कार्यालयात भेट दिली. परंतू कार्यालय बंद असल्यामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांकडे याची विचारणा केली. यावेळी त्यांनी अध्यक्ष रोज येतात? आज का आले नाहीत? अशी विचारणा करत कर्मचाऱ्यांची शाळाच घेतली.

मार्गदर्शन कोण करणार ?

त्यानंतर राज्य सरकारने बदल केलेल्या सुधारीत विकास आराखड्यासंदर्भात जनतेला नकाशा पाहण्यासाठी केलेल्या कक्षाला भेट दिली. या कक्षात नगरसेवक कधी पाहणीसाठी येतात, अशी विचारणा केल्यानंतर त्यांनी एच-पूर्व विभागाचा नकाशा दाखवण्याची सूचना केली. परंतू यावेळी एच-पूर्वचा प्लॅनरच तिथे उपस्थित नव्हता. महापौरांनीही यावर तीव्र नाराजी व्यक्त करत जर या विभागाचा कोणी नागरिक आला तर त्याला मार्गदर्शन कोण करणार असा सवाल केला.


विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयाला भेट 

महापौरांनी त्यानंतर स्थापत्य समिती (उपनगरे), बाजार व उद्यान समिती, विधी समिती आणि शिक्षण समिती, आरोग्य समिती, महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षांच्या दालनाला भेट दिली. या चारही समित्यांचे अध्यक्ष दालनात उपस्थित नव्हते. मात्र, बाजार व उद्यान समिती अध्यक्षांना महापौर आल्याची माहिती मिळताच ते धावत आपल्या दालनात परतले. मात्र, सभागृहनेत्या विशाखा राऊत आणि स्थापत्य शहर समिती अध्यक्षा अरुंधती दुधवडकर या उपस्थित असल्याने त्यांच्याशी सुसंवाद साधत महापौरांनी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्याही कार्यालयाला भेट दिली. यावेळी रवी राजा हेही दालनात उपस्थित असल्याने तिथे चहापानी करत त्यांनी आपल्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला.


महापौरांचा अध्यक्षांना फतवा

९ ऑगस्ट हा क्रांतीदिन आहे. यादिवशी समिती अध्यक्षांनी महाराष्ट्र बंदचं कारण देत कार्यालयात नसावं हे योग्य नसून समिती अध्यक्षपदाची जी जबाबदारी पक्षाने खांद्यावर टाकली आहे, त्या समितीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवले जावेत, हीच भावना आहे. परंतू समिती अध्यक्षच गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे येत होत्या. त्यामुळेच ही अचानक पाहणी करून याचा आढावा घेतला असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे यापुढे समिती अध्यक्षांनी कार्यालयात येणार नसेल तर याची कल्पना महापौरांना द्यावी, असा फतवाच समिती अध्यक्षांना बजावत त्यांनी कडक शिस्तीची छडीच उगारली आहे.



हेही वाचा -

अकरावी प्रवेशासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा