मुंबईतील पदपथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असून, पादचाऱ्यांचे हित लक्षात घेऊनच पदपथांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पदपथ नसतील तर आधीच रस्त्यांवर उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यांवरुन चालताना अपघात होण्याचे प्रकार वाढत असतानाच आता भाजपाने रस्त्यांवरील पदपथ काढून टाकण्याची मागणी केली आहे. मुंबईच्या माजी उपमहापौर आणि भाजपा नगरसेविका अलका केरकर यांनी 30 फुटांपेक्षा कमी असणाऱ्या रस्त्यांची सुधारणा करताना त्याच्या दोन्ही बाजूचे पदपथ न ठेवता एकाच बाजूला पदपथ ठेवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मुंबईकरांनो, यापुढे रस्त्यावरुनच चाला, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
मुंबईचा झपाट्याने विकास होत असून, इथल्या जुन्या चाळी, मोडकळीस आलेल्या इमारती, बंगले इत्यादींच्या पुनर्विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. काही ठिकाणी कामे पूर्ण होऊन टोलेजंग इमारती देखील उभ्या राहिल्या आहेत. परंतु हा पुनर्विकास होऊनही त्याठिकाणी असणाऱ्या रस्त्यांची रुंदी वाढवणे शक्य नसल्यामुळे अशा रस्त्यांची रुंदी तेवढीच राहिलेली आहे. अशा अरुंद रस्त्यांवर लोकांची आणि वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे लोकांना ये-जा करण्यास त्रास होतो. परिणामी वाहतूक कोंडीची समस्याही मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यामुळे 30 फुटांपेक्षा कमी असणाऱ्या रस्त्यांची सुधारणा करताना त्यांच्या दोन्ही बाजूला पदपथ न ठेवता एकाच बाजूला पदपथ ठेवावा, अशी मागणी आपण ठरावाच्या सूचनेद्वारे केल्याचे माजी उपमहापौर अलका केरकर यांनी म्हटले आहे.
मुंबईतील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करून विकास केल्यानंतरही त्या रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहने उभी राहू लागली आहे. या वाहनांच्या आड पदपथ झाकून गेले असून, या पदपथांची विशेष काळजी घेऊन पादचाऱ्यांना सहज चालता यावे, अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यास महापालिका अपयशी ठरली आहे. तसेच, अनेक रस्त्यांसह पदपथही फेरीवाल्यांनी अडवल्यामुळे नागरिकांना रस्त्यांवरून चालावे लागते. परंतु, या फेरीवाल्यांना हटवून हे पदपथ पादचाऱ्यांना चालण्यास उपलब्ध करुन देण्याची कोणतीही तसदी प्रशासनाकडून घेतली जात नसून, आता भाजपाने अशा प्रकारे मागणी करत एकप्रकारे प्रशासनाच्या कामचुकारपणाला खतपाणी घालण्याचे ठरवल्याचे दिसून येते. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी यावर आपले मत व्यक्त करत नाराजीही व्यक्त केली. पदपथ हे नागरिकांना चालण्यासाठी तर रस्ते हे वाहनांच्या वाहतुकीसाठी आहेत. वाहतुकीची कोंडी होऊ नये किंवा वाहनांसाठी रस्ते उपलब्ध करून देताना त्या रस्त्यांवरून चालणाऱ्या पादचाऱ्यांचीही गैरसोय होऊ नये, हेही तेवढेच महत्वाचे आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला पदपथ असायला हवेत, असे त्यांनी सांगितले.