कल्याण आणि डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा मंगळवार, 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) पाणीपुरवठा विभागाच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद असले. यासंदर्भातील माहिती महापालिकेच्या यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली.
उल्हास नदीच्या काठावरील मोहिली, नेतिवली येथील जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण, डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा केला जातो. या दोन्ही जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत व यांत्रिक उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या कंत्राटदाराकडून 15 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.
या दुरुस्तीच्या काळात कल्याण शहरासह कल्याण पश्चिमेतील मांडा, टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, मिलिंद नगर, योगीधाम, चिकनघर, बिर्ला कॉलेज परिसर, मुरबाड रोड परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत डोंबिवली पूर्व, पश्चिमेला पाणीपुरवठा होणार नाही.
या दुरुस्तीच्या कामामुळे कल्याण, कल्याण ग्रामीण, डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल एवढा पाणीसाठा करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
हेही वाचा