Advertisement

यंदा फटाक्यांच्या विक्रीवर पोलिसांची करडी नजर; बेकायदा स्टॉलवर होणार कारवाई

बेकायदा फटाके विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार असून बंदी असलेल्या फटाक्यांच्या विक्रीवरही पोलिसांची नजर असणार आहे.

यंदा फटाक्यांच्या विक्रीवर पोलिसांची करडी नजर; बेकायदा स्टॉलवर होणार कारवाई
SHARES

दरवर्षी दिवाळीनिमित्त अनेकजण फटाके, कपडे, दिवे, रांगोळी, पणत्या, लाईट्स या वस्तूंचे स्टॉल लावतात. दिवाळी अगोदरचे १० दिवस स्टॉल लावतात. परंतु यंदा कोरोनामुळं अनेक विक्रेत्यांनी अद्याप स्टॉल लावलेले नाहीत. अशातच यंदा ध्वनिप्रदूषण आणि वेळेचं बंधन झुगारणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. बेकायदा फटाके विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार असून बंदी असलेल्या फटाक्यांच्या विक्रीवरही पोलिसांची नजर असणार आहे.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानं दिवाळीत मोठी गर्दी उसळण्याची शक्यता असल्यानं पोलिसांनी पूर्वतयारी सुरू केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबईत लॉकडाऊन लागू करण्यात आला. परिणामी, लॉकडाऊनमुळं सर्व धर्मियांचे सण साध्या पद्धतीनं पार पडले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, ईद यांसारखे सर्वच सण अगदी साध्या पद्धतीनं मुंबईसह राज्यात साजरे करण्यात आले. दिवाळी विशेषकरून मुंबईसारख्या शहरात मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सामाजिक वावर पाळणे, मास्क घालणे बंधनकारक आहे तसेच इतरही नियमांचे पालन आणि त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत.

इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत फटाक्यांची खरेदी-विक्री तसेच फोडण्याचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे बंदी असलेल्या फटाक्यांची विक्री, बेकायदा फटाके विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. मुंबईतील गर्दी होणाऱ्या बाजारात स्थानिक पोलिसांना बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून काही ठिकाणी यासाठी एसआरपीएफची मदतही घेतली जात आहे.

सर्वोच्च न्यायालयानं २०१८ मध्ये फटाके वाजविण्यावर वेळेचे बंधन घातले आहे. नागरिकांना न्यायालयाच्या आदेशाबाबत कळावे यासाठी पोलिसांच्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.

दिवाळीमध्ये फटाके मोठ्या प्रमाणात वाजविले जातात. याच संधीचा गैरफायदा देशविघातक अपप्रवृत्ती घातपात घडविण्यासाठी करू शकतात. त्यामुळे या दृष्टीने देखील पोलिसांना दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे. विशेष करून धार्मिक आणि प्रार्थनास्थळे, महत्त्वाच्या संवेदनशील इमारती या ठिकाणी गस्त वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अफवा पसरविणाऱ्यांवर तसेच जातीय सलोखा बिघडविणाऱ्यांवरही पोलिसांची नजर असणार आहे.

दिवाळी सणामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी-विक्री केली जाते. कोरोनाचे संकट असले तरी खरेदीसाठी बाजारांमध्ये गर्दी होत आहे. चोरी, सोनसाखळी चोरी तसेच दुकानांवरील दरोडे रोखण्यासाठी साध्या वेशात पोलिसांची गस्त असेल. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांना नियुक्त करावे, असे पोलिस ठाण्यांना कळविण्यात आले आहे.

कोरोना काळ असला तरी आता बरेच नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईकर दिवाळीत मुंबईबाहेर फिरायला जाण्याची शक्यता असल्याने घरफोडी रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा