जमिनीच्या वादातून सुभाष जाधव (५४) नावाच्या व्यक्तीने शुक्रवार २० आॅगस्ट रोजी सकाळच्या सुमारास मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. तब्येत खालावल्यानंतर जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सुभाष जाधव हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी गावातील रहिवासी आहेत. गेल्या ६ महिन्यांपासून गावातील शिंदे कुटुंबासोबत त्यांचा शेतजमिनीवरून वाद सुरू होता. सातत्याने झगडा भांडण आणि मारामारीतून मंचर पोलिसांत शिंदे यांच्यावर ३ तर जाधव यांच्यावर २ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
या जमिनीच्या वादातूनच न्याय मिळवण्यासाठी सुभाष जाधव २० आॅगस्ट रोजी मंत्रालयात पोहोचले. मात्र मंत्रालयात त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने जाधव यांनी रागाने मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेऊन तातडीने नजीकच्या जीटी रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारांदरम्यान रविवारी परिस्थिती खाल्यावल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा- घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ
सध्या कोविड विषाणू संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून बाहेरून येणाऱ्या अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जात नाही. मध्यंतरी मोठ्या प्रमाणात मंत्रालयीन कर्मचारी कोरोना संसर्गाच्या जाळ्यात अडकला होता. त्यामुळे ही दक्षता घेण्यात येत आहे.
याआधी १५ ऑगस्ट रोजी एका शेतकऱ्याने मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. मुख्यमंत्री मंत्रालयातील ध्वजारोहण करून बाहेर पडल्यानंतर मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून या शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुनील गुजर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. गुजर जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. आर्थिक अडचणीमुळे त्रस्त झाल्याने आत्महदनाचा प्रयत्न केल्याची माहिती गुजर याने पोलिसांना दिली होती.