Advertisement

मानूरवाडी नाल्याची संरक्षक भिंत कधी बांधणार?


मानूरवाडी नाल्याची संरक्षक भिंत कधी बांधणार?
SHARES

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामासाठी महापालिकेने वडाळा (पू.) येथील कोरबा मिठागरमधील मानूरवाडी नाल्याची संरक्षक भिंत तोडली होती. नालेसफाईचे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेने या भिंतीची पुनर्बांधणी करणे अपेक्षित होते. परंतु महापालिकेने तसे न केल्यामुळे दोन दिवसांपूर्वी एक व्यक्ती या नाल्यात पडून जखमी झाली. तेव्हापासून नाला परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोरबा मिठागर परिसरातील मानूरवाडी नाला हा माता रमाई येथील आदर्शनगर या मोठ्या नाल्याच्या अंतर्गत येतो. या नाल्याची सफाई करण्यासाठी महापालिकेने 2016 साली नाल्यालगतची एका बाजूची संरक्षक भिंत तोडली होती. या भिंतीची पुनर्बांधणी करणे अपेक्षित असताना महापालिकेने यावर्षी नाल्याच्या दुसऱ्या बाजूची संरक्षक भिंत देखील तोडली. नाल्यातून काढून ठेवलेला गाळही मागील 15 दिवसांपासून नाल्याच्या कडेला पडून आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली आहे.

नाल्यालगत राहणाऱ्या रहिवाशांना येथून ये-जा करण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने याच गाळातून वाट काढत त्यांना घर गाठावे लागत आहे. अनेक जण या गाळावरून पाय घसरून पडत आहेत. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी येथील एक स्थानिक चिखलावर पाय घसरून थेट नाल्यात पडल्याची घटना घडली होती. इतर रहिवाशांनी त्यांना ताबडतोब नाल्याबाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. परंतु या प्रकारामुळे रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

संरक्षक भिंतीअभावी येथील स्थानिकांना जीव मुठीत घेऊन येथून ये-जा करावी लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. नाले सफाईचे काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक भिंत उभारण्यात यावी. अन्यथा पावसात पाणी तुंबल्यास नाल्याचा अंदाज न आल्याने अनेकांना जीवघेणा अपघात होऊ शकतो, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

या ठिकाणाची पाहणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर नाल्यातील गाळ नाल्याबाहेर काढून झाल्यानंतर येथे संरक्षक कुंपण लावण्यात यावे, असे आदेश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत.

- प्रमोद खेडेकर, उप मुख्य अभियंता, एफ उत्तर विभाग, महापालिका

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा