Advertisement

सेव्हन हिल्स रुग्णालय ताब्यात घेण्याची शिवसेनेची मागणी


सेव्हन हिल्स रुग्णालय ताब्यात घेण्याची शिवसेनेची मागणी
SHARES

एकेकाळी कर्करोग रुग्णालय उभारण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या अंधेरी पूर्व मरोळमधील इमारतीची जागा महापालिकेने खासगी सेव्हन हिल्स या संस्थेला भाडेकरारावर दिली. त्यावर आज सुसज्ज रुग्णालय उभे असले तरी प्रत्यक्षात या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पगार द्यायला व्यवस्थापनाकडे पैसे नाहीत. त्यामुळे या रुग्णालयाची आर्थिक स्थिती कमजोर असून हे रुग्णालय महापालिकेने साधनसामग्रीसह ताब्यात घेऊन सर्वसाधारण जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना करत आहे.


चौकशीची मागणी

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी १७ फेब्रुवारी २०१८ रोजी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना निवेदन देऊन सेवन हिल्स रुग्णालयाच्या कारभाराकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. सेव्हन हिल्स रुग्णालयातील खाटांची एकूण क्षमता १५०० खाटांची आहे. पण प्रत्यक्षात केवळ ३०० खाटांचेच रुग्णालय कार्यरत आहे. ही बाब गंभीर असून याची तातडीने चौकशी करण्याची मागणी शेवाळे यांनी केली.


महापालिकेने वैद्यकीय सुविधा द्यावी

मुंबई महापालिका आणि सेव्हन हिल्स संस्थेमध्ये करार होऊन सार्वजनिक खासगी प्रकल्पांतर्गत सन २०१०मध्ये सेव्हन हिल्स या १५०० खाटांच्या रुग्णालयांची निर्मिती करण्यात आली. पण सन २०१३-१४मध्ये साधारणत: १५० कोटींचा तोटा रुग्णालयाने जाहीर केला. या रुग्णालयाची शाखा विशाखापट्टण येथे असून या दोन्ही शाखेच्या रुग्णालयाची सुमारे १२०० कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे मागील ऑगस्ट-सप्टेंबरपासून येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होत नाहीत. त्याचा परिणाम वैद्यकीय सेवेवर होत असल्याची बाब शेवाळे यांनी महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. यासोबतच हे रुग्णालय ताब्यात घेऊन महापालिकेने वैद्यकीय सुविधा द्यावी, असं शेवाळे यांनी म्हटलं आहे.


येथे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करा

महापालिकेच्या १७ एकर जागेवर बांधण्यात आलेल्या सेवन हिल्स रुग्णालयाची आर्थिक स्थिती दयनीय असल्यामुळे तसेच याप्रकरणी न्यायालयात दावा सुरू आहे. त्यामुळे सोयी सुविधांनी युक्त असलेल्या या रुग्णालयांमध्ये सुपर स्पेशालिटी सर्विसेस उपलब्ध केल्यास उपनगरातील रुग्णांना याचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे याठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करून नागरिकांना सुविधायुक्त रुग्णालय उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना नगरसेविका आणि माजी आरोग्य समिती अध्यक्षा रोहिणी कांबळे यांनी आरोग्य समितीच्या बैठकीत केली आहे. त्यामुळे आरोग्य समिती अध्यक्षा अर्चना भालेराव यांनी हे पत्र मंजूर करून आयुक्तांच्या अभिप्रायसाठी पाठवले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा