मुंबईच्या (mumbai) कोस्टल रोडवर (coastal road) वेगाला आळा घालण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांच्या मदतीने या मार्गावर 28 ठिकाणी स्पीड डिटेक्शन कॅमेरे (speed detection camera) बसवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने (bmc) घेतला आहे.
हे काम एल अँड टी कंपनीमार्फत होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असून डिसेंबरअखेरपर्यंत कॅमेरे बसवण्यात येतील, अशी माहिती मुंबई महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
सध्या वेगमर्यादा नाही तसेच वेगावर नजर ठेवण्यासाठी कॅमेरेही नाहीत.
मुंबई कोस्टल रोड प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत बांधण्यात येत आहे. यातील पहिला टप्पा म्हणजेच वरळीतील बिंदुमाधव ठाकरे चौक (वरळी) मरिन ड्राइव्ह ही दक्षिण वाहिनी 11 मार्च 2024 रोजी खुली करण्यात आली.
मरिन ड्राइव्ह ते हाजी अली मार्ग लोटस जंक्शन हा टप्पा 10 जून रोजी, तर हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतचा साडेतीन किमीचा टप्पा 11 जुलैला सुरू झाला. त्यानंतर 13 सप्टेंबरला वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडणारी दक्षिण बाजूकडील वाहिनी सुरू करण्यात आली. यामुळे प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे (bandra) असा थेट प्रवास करणे शक्य झाले आहे.
मुंबई कोस्टल रोडवर ताशी 80 किमी वेगाने, तर बोगद्यातून ताशी 60 किमी वेगाने वाहन चालवण्याची परवानगी आहे. वेगमर्यादेचे फलकही ठिकठिकाणी लावले आहेत. बोगद्यात वाहनांवर नजर ठेवण्यासाठी दर 50 ते 100 मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
मात्र वेगवान वाहने तसेच लेन कटिंग करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी बोगद्यातील कॅमेरे यंत्रणा अद्याप सुरू झालेली नाही. यातून केवळ वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येते. जोपर्यंत सर्व मार्गांवर स्पीड डिटेक्शन कॅमेरे बसवून होत नाहीत, तोपर्यंत बोगद्यातील यंत्रणाही सुरू होणार नाही.
या पार्श्वभूमीवर, वेगमर्यादेचे उल्लंघन करून अपघाताला कारण ठरणाऱ्या वाहनचालकांना लगाम लावण्यासाठी 28 ठिकाणी स्पीड डिटेक्शन कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. एल अँड टी कंपनीमार्फत हे काम केले जाईल.
सध्या हा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या लेखा विभागाकडे आहे. लवकरच तो मुंबई महापालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. आयुक्तांच्या मंजुरीनंतर 28 ठिकाणी कॅमेरे बसवण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा अवधी लागेल. त्यानंतर ते कॅमेरे वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला जोडले जातील. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीला कोस्टल रोडवरून जाणाऱ्या अतिवेगवान वाहनांवर कारवाई करणे शक्य होणार आहे.
असे काम करतील कॅमेरे
शंभर व्हिडीओ इंसिडेन्ट कॅमेरेही बसवणार
सध्या सागरी किनारा मार्गावर बोगद्याशिवाय अन्य कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. बोगद्यात 81 कॅमेरा आहेत. यामध्ये 12 सीसीटीव्ही आणि 69 व्हिडीओ इंसिडेन्ट कॅमेरे आहेत. वाहनांच्या, अपघातांच्या हालचाली अगदी जवळून टिपू शकतो, अशी यंत्रणा यामध्ये आहे. स्पीड डिटेक्शन कॅमेराशिवाय अशा प्रकारचे आणखी शंभरहून अधिक व्हिडीओ इंसिडेन्ट कॅमेरे बसवण्याचे काम होणार आहे.
हेही वाचा