दक्षिण मुंबईतील (mumbai) वाळकेश्वर (walkeshwar) येथील बाणगंगा तलाव (banganga lake) हे ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी येथील पायऱ्यांची कामे करण्यात आली होती. मात्र आता कामाचा दर्जा राखला जात नसल्याचा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
या तलावाच्या पायऱ्या बसवण्यासाठी विटांच्या चुऱ्याचा वापर करण्यात येत असल्याची एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तलावाच्या पायऱ्यांचे नुकसान केल्यामुळे आधीच्या कंत्राटदाराला निलंबित केले होते. तरीही पुन्हा तीच गत असल्याबद्दल या क्षेत्रातील तज्ज्ञांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने (BMC) हाती घेतला आहे. अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे तलावाच्या पायऱ्या, पायऱ्यांचे दगड, दीपस्तंभांची दुरावस्था झाली होती.
तसेच तलाव परिसरातील पायऱ्यांवरील (stairs) बांधकामे झाली होती. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिकेने बाणगंगा तलाव व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला होता.
मात्र आधीच्या कंत्राटदाराने तलावातील गाळ काढताना पायऱ्यांचे नुकसान केले होते. त्यामुळे कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्याचे कंत्राटही रद्द करण्यात आले होते. त्यानंतर पालिकेने नव्याने निविदा काढण्याचे ठरवले होते.
तेव्हापासून बाणगंगा तलावाचे काम ठप्प झाले होते. मात्र या तलावाच्या पायऱ्यांचे काम सुरु असतानाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सामाजिक कार्यकर्ते झोरू भतेना यांनी हा व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकला आहे. त्यात बाणगंगा तलावाच्या पुरातन पायऱ्या बसविताना विटांच्या चुऱ्याचा वापर करताना एक कामगार दिसत आहे. याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली आहे.
बाणगंगा ही पुरातन वास्तू असून त्याच्या कामासाठी कोणी सल्लागार नेमला आहे की नाही, त्याची काही जबाबदारी आहे की नाही, असा सवाल पुरातन वास्तुतज्ज्ञ भरत गोठोसकर यांनी केला आहे.
बाणगंगा परिसर आणि या ठिकाणची मंदिरे यांच्याशी संबंधित कामांमध्ये योग्य आदर ठेवला जाणे अपेक्षित आहे. पुरातत्त्व विभागाशी समन्वय साधून बाणगंगा परिसरातील उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पालिका प्रशासनाला दिल्या होत्या.
तसेच सूचनांचे पालन होते का, असा सवालही स्थानिक विचारत आहेत. याप्रकरणी पालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
हेही वाचा