पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रूझ स्थानकातील पादचारी पूल नवीन वर्षात म्हणजे १ जानेवारीला प्रवाशांसाठी खुलणार आहे. पूर्व पश्चिमेला जोडणारा हा पादचारी पूल दुरुस्तीच्या कामासाठी सप्टेंबर महिन्यापासून बंद ठेवण्यात आला होता. या पुलाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असून मंगळवारपासून हा पादचारी पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
सांताक्रूझ स्थानकातील हा पूल बंद केल्यामुळं स्थानकातील मधल्या पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. प्रवाशांना धक्काबुक्की सहन करत प्रवास करावा लागत होता. त्यावेळी प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेत पश्चिम रेल्वेनं हा पादचारी पूल अखेर १ जानेवारीपासून खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं या पुलावरून सांताक्रूझ स्थानकातील फलाट क्रमांक ३ आणि ४ वर पोहोचणं शक्य होणार आहे.
पुलाच्या पूर्वेकडील जिने बंद आहेत. पूर्वेकडील जिन्यांखाली महापालिका कार्यालय आणि शौचालयाचं पाडकाम बाकी आहे. या पाडकामानंतर पुलाचे जिने बदलण्याचं काम सुरू होणार असून हे काम ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.
सांताक्रूझ स्थानकावरील हा पादचारी पूल महापालिकेने १९७१ मध्ये उभारला होता. या पादचारी पुलाची लांबी ९०.३ मीटर आणि रुंदी ६ मीटर आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये पुलाची तपासणी करण्यात आली होती. तेव्हा पुलावरील काँक्रिट डेक धोकादायक स्थितीत असल्याचं आढळलं होतं. त्यामुळे ११ सप्टेंबरपासून पुलाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला २५ सप्टेंबरपासून सुरुवात झाली. रोज मध्यरात्री १.३० ते पहाटे ४ या वेळेत पूल दुरुस्तीचं काम सुरू होतं.
हेही वाचा-
सांताक्रूझचा पादचारी पूल ३१ डिसेंबरपासून प्रवाशांसाठी खुला
मुंबईकरांना लवकरच मिळणार पहिली 'मेगा लोकल'