शिवडी - भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना 87 व्या हुतात्मा दिनानिमित्त मानवंदना देण्यात आली. सामोपचारी संघटना आणि कामगार संघटना एकत्र आणण्याच्या उद्देशाने 23 मार्च रोजी परळ (पू.) येथील कामगार मैदानापासून ते शिवडी (प.) येथील शहीद भगतसिंग मैदानापर्यंत रॅली काढण्यात आली. ऑल इंडिया युथ फेडरेशन आणि ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने ही रॅली काढण्यात आली. या वेळी इनकलाब जिंदाबादच्या घोषणा देखील देण्यात आल्या.
सदर रॅली शिवडी येथील शहीद भगतसिंग मैदानात आल्यानंतर भगतसिंग यांच्या प्रतिमेला मानवंदना देऊन अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले. आपल्या देशाला पुढे जायचं असेल तर भगतसिंग यांनी केलेल्या कामाचा आदर्श आजच्या तरुण पिढीने डोळ्यासमोर ठेवायला हवा असं या वेळी उपस्थित असलेले भारतीय कम्युनिटी पक्ष महाराष्ट्र सचिव मंडळ सदस्य प्रकाश रेड्डी म्हणाले.
या वेळी ऑल इंडिया युथ फेडरेशनचे अध्यक्ष प्रसाद घागरे, स्मृती सेवा संघाचे सचिव धनंजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.