Advertisement

मुंबईसह दादरमधील कबुतरखाना बंद होणार?

मुंबईत विविध ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृतपणे कबुतरखाने उभे राहिले आहेत.

मुंबईसह दादरमधील कबुतरखाना बंद होणार?
SHARES

मुंबईतील (mumbai) अनधिकृत कबुतरखाने आणि दादरचा सुप्रसिद्ध कबुतरखाना (kabutarkhana) बंद करावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा मोहीम सुरू केली आहे. मनसेच्या पर्यावरण सेनेने याकरीता मुंबई महानगरपालिका आणि पोलीस विभागाकडेही मागणी केली आहे.

त्यामुळे दादरचा कबुतर खाना अन्यत्र हलवण्याचा विचार पुन्हा एकदा पुढे आला आहे. याप्रकरणी दादरमधील रहिवाशांबरोबर चर्चा करण्यासाठी लवकरच एका सभेचे आयोजनही करण्यात येणार आहे.

मुंबईतील कबुतरांची (pigeon) संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे श्वसनाच्या आजाराचा धोकाही वाढत आहे. या विषयावर गेल्या काही वर्षांपासून समाजाच्या विविध स्तरातून जनजागृती केली जात आहे. मात्र हा विषय मागे पडत जातो.

महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेने गेल्या काही महिन्यांपासून हा विषय पुन्हा एकदा लावून धरला आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच दादरचा कबुतरखाना हटवण्याची मागणी केली होती.

मात्र हा कबुतरखाना पुरातन असल्यामुळे ‘जैसे थे’ च आहे. आता पुन्हा एकदा कबुतरांच्या वाढत्या संख्येचा मुद्दा पुढे आल्यामुळे दादरचा कबुतरखानाही चर्चेत आला आहे.

मुंबईत विविध ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृतपणे कबुतरखाने उभे राहिले आहेत. समुद्र किनाऱ्यांवर कबुतरांसाठी धान्य विकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे धान्य विकत घेऊन तिथेच कबुतरांसाठी टाकले जात असल्यामुळे कबुतरांची संख्या वाढते आहे.

ही कबुतरे मग आजूबाजूच्या रहिवासी इमारतीच्या खिडक्यांमध्ये घर करतात. त्यामुळे त्यांच्या विष्ठेतून व पिसांमधून श्वसनाचे आजार पसरत आहेत. नागरिकांच्या जिवाशी खेळणारे हे अनधिकृत कबुतरखाने बंद झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे, असे मनसेच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांनी सांगितले.

हिंदुजा रुग्णालयाजवळ समुद्र किनाऱ्यावर असाच कबुतरखाना अनधिकृतपणे तयार होत होता, तो बंद करण्यात आला आहे. कबुतरांना दाणे घालू नये असा पालिकेचा फलक असून त्या खालीच दाणे, गाठ्या विकणारा इसम बसत होता, अशी माहिती जय शृंगारपुरे यांनी दिली.

दादरचा (dadar) कबुतरखाना बंद झाला पाहिजे किंवा तो शहराच्या बाहेर कुठेतरी न्या, अशीही मागणी त्यांनी केली. कबुतरखाना पुरातन असेल, तो हटवता येत नसेल तर या ठिकाणी क्लिन अप मार्शल ठेवून कबुतरांना दाणे घालणे बंद करावे, अशी मागणी त्यांनी केली.

दादर हा गजबजलेला परिसर असून या ठिकाणी मोठ्या संख्येने ग्राहक खरेदीसाठी येतात, मोठ्या संख्येने दुकानदार, विक्रेते, रहिवासी आहेत. त्यांना या कबुतरांमुळे श्वसनाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे हा कबुतरखाना अन्यत्र हलवण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, या विषयावर दादरमधील रहिवाशांशी चर्चा करण्यासाठी पालिकेच्या (bmc) जी उत्तर विभागाच्यावतीने लवकरच एका बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. दादरचा कबुतरखाना अन्यत्र हलवण्याविषयी बैठकीत चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.



हेही वाचा

दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार?

गणेशोत्सवात मुंबई ते गोवा रो-रो बोट सेवा सुरू करण्याची योजना

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा