भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याची मुंबईच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. विनू मंकड स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जाहीर करण्यात आला आहे. विनू मंकड या स्पर्धेला ६ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून मुंबईचा पहिला सामना गुजरातविरुद्ध होणार आहे.
१९ वर्ष पूर्ण झाल्यामुळे अर्जुन तेंडुलकरला वन डे मालिकेसाठी संघामध्ये स्थान देण्यात आलं नव्हतं. वयाच्या कारणामुळेच २०२० च्या कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतही तो खेळू शकणार नाही. मात्र विनू मंकड स्पर्धेत चांगली कामगिरी करून मुंबईच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
विनू मंकड स्पर्धेत मुंबईचा पहिला सामना ६ ऑक्टोबर रोजी गुजरातविरुद्ध होणार आहे. 7 ऑक्टोबर रोजी बंगालविरुद्ध, ९ ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेशविरुद्ध, १२ ऑक्टोबर रोजी कर्नाटकविरुद्ध, १६ ऑक्टोबर रोजी आसामविरुद्ध, १८ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रविरुद्ध, २० ऑक्टोबर रोजी झारखंडविरुद्ध आणि २२ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशविरुद्ध सामने होणार आहेत.
वेदांत मुरकर (कर्णधार), सुवेद पारकर, प्रज्ञेश कानपिल्लेवार, दिव्यांश सक्सेना, सागर छाब्रीया, अक्षत जैन, आर्सलान शेख, हाशीर दाफेदार, वैभव कलमकर, अथर्व अंकोळेकर, आकाश शर्मा, अर्जुन तेंडुलकर, उझैर खान, अथर्व पूजारी, आर्यन बढे.