इंडियन प्रीमियर लीग (आयपीएलनंतर) आता क्रिकेट प्रेमींमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यांची चर्चा रंगली आहे. कोरोनामुळं वर्षाच्या सुरूवातील होणारे सर्व क्रिकेट सामने रद्द करण्यात आल्यानं क्रिकेट प्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. परंतू, २०२० वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यांमुळं क्रिकेटप्रेमींमधील उत्साह पुन्हा वाढला आहे. दरम्यान भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील संघ निवडीवरून बराच वाद झाला होता. रोहित शर्माच्या निवडीवरून बराच गोंधळ घातल्यानंतर त्याला कसोटी संघात स्थान दिलं गेलं होतं. पण आता रोहित शर्मा आणि इशांत शर्मा हे दोघंही कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. हे दोन्ही खेळाडू सध्या बेंगळुरू येतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी इथं फिटनेसवर काम करत आहेत.
भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरूवात २७ नोव्हेंबरपासून होणार आहे. प्रथम वनडे मालिका होणार असून, त्यानंतर ३ सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. तसंच, १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली फक्त पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर तो भारतात परतणार आहे.
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयनं हे स्पष्ट केलं होतं की या दोन्ही खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष ठेवलं आहे. दोन्ही बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या आधी दोघे फिट होतील. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित आणि इशांतच्या फिटनेसवर एनसीएमधील अधिकाऱ्यांची बैठक झाली. दोन्ही खेळडूंची फिटनेस रिपोर्ट फार समाधानकारक नाही. याची माहिती संघ व्यवस्थापन, निवड समिती आणि बीसीसीआयला देण्यात आली आहे. त्यामुळं रोहित आणि इशांत कदाचितच कसोटी मालिका खेळू शकणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकर केलं जाण्याची शक्यता आहे.