कुर्ला - हनुमाननगर इथं पडलेला हा स्विमिंगपूल एवढा मोठा खड्डा. याच खड्ड्यामुळे एक चिमुकला आपल्या आईवडिलांपासून दुरावला. हा खड्डा चिमुकल्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. खड्ड्यात पडून मोहम्मद अली या सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. या खड्ड्यात पाणी साचलं होतं. त्यामुळे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. स्थानिकांनी मोहम्मदला खड्ड्यातून बाहेर काढलं. त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
पालिकेनं शौचालय बांधण्यासाठी हा खड्डा खोदला खरा. पण तो या मुलाच्या जिवावर उठला. त्यामुळे मोहम्मदचे वडिल सय्यद यांनी दोषींवर कारवाईची मागणी केलीय. पण एवढं होऊनही माजी नगरसेवक म्हणतायेत की ही पालिकेची चूक असली तरी पालकही एवढेच दोषी आहेत. आपलं मुल कुठ जातंय? याकडे पालकांचंही लक्ष असायला हवं, असं स्पष्टीकरण माजी नगरसेवक कमलाकर नाईक यांनी दिलं.
मोहम्मदच्या मृत्यूला ठेकेदारही तितकाच जबाबदार आहे. विकासकामांचा दावा करणाऱ्या पालिकेनं एका चिमुरड्याचा जीव घेतला. या घटनेनंतर तरी पालिकेनं काही बोध घ्यावा, एवढीच आशा.