ईएमआयवर घेतलेल्या दुचाकीचे पैसे भागवण्यासाठीच एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची गळा चिरून हत्या केल्याची कबुली २० वर्षीय आरोपी रईस उर्फ सर्फराज शेख याने न्यायालयात दिली. न्यायालयाने या प्रकरणी त्याला १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मूळचा नवी मुंबईतील रहिवासी असलेला सर्फराज संघवी यांचं कार्यालय असलेल्या लोअर परळच्या कमला मिल कंपाऊंडमध्येच बिगारीचं काम करायचा. त्यामुळे दोघांची तोंडओळख झाली होती. काही महिन्यांपूर्वी सर्फराजने दुचाकी ईएमआयवर घेतली होती. त्याचे हप्तेही थकलेले होते. घरातील खर्च आणि दुचाकीचे हप्ते मिळणाऱ्या मिळकतीत भागवणं शक्य होतं नसल्याने दिवसेंदिवस त्याच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत होता. यातूनच चाकूचा धाक दाखवून कुणाकडून तरी पैसे उकळून कर्ज भागवण्याचं सर्फराजने ठरवलं होतं.
संघवी कार्यालयात कायम सकाळी ९ पर्यंत यायचे तर रात्री ८ पर्यंत निघायचे. तोंड ओळख असलेले संघवी हे बँकेत मोठ्या हुद्द्यावर असल्याची कल्पना सर्फराजला होती. बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याला लुटल्यास चांगले पैसे मिळतील, या विचारातून त्याने संघवी यांना लुटण्याचा कट रचला.
संघवी यांचं कार्यालय असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एचडीएफसी बँकेचं पार्किंग होतं. त्या ठिकाणी सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंतच सुरक्षा रक्षक आलेल्या आणि गेलेल्या गाड्यांच्या नोंदी ठेवतो. पार्किंग परिसरात सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळे संघवी कार्यालयाबाहेर पडतात, तेव्हा तिर्थ कोणताही सुरक्षा रक्षक नसतो. हे हेरून सर्फराजने ५ सप्टेंबर रोजी संघवी यांना इमारतीच्या पार्किंग परिसरात रात्रीच्या ८ च्या सुमारास गाठलं.
चाकूच्या धाकावर पैसे मागितल्यानंतर संघवी यांनी त्याला पोलिसांची भीती दाखवली. त्यावेळी भेदरलेल्या सर्फराजने संघवी यांच्यावर दुसऱ्याच क्षणी चाकूने हल्ला केला. संघवी यांची गळा चिरून हत्या केल्यानंतर सर्फराजने संघवी यांचा मृतदेह कपड्यात गुंडाळून त्यांच्याच गाडीच्या मागच्या सीटवर ठेवला.
पोलिस सीमकार्डच्या मदतीने आरोपीची शोध घेतात हे जाणून सर्फराजने संघवी यांचा फोन घेऊन तो बंद केला. संघवीचा मृतदेह सर्फराजने कल्याणच्या हाजीमंलग रोडवरील काकडवाला गावाजवळील नाल्यात फेकला. तेथून गाडी नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथील पार्किंगमध्ये लावून सर्फराजने घरी पळ काढला.
मात्र संघवी बेपत्ता असल्याची बातमी सर्व प्रसार माध्यमांनी उचलून धरल्यानंतर संघवी यांच्या घरातले, पोलिसांची मदत घेतील या उद्देशाने प्रकरण निवाळण्यासाठी संघवी यांच्या मोबाइलमधील सीमकार्ड काढून त्यात दुसरे सीमकार्ड टाकत सर्फराजने संघवींच्या घरातल्यांना फोन केला. फोनवर सर्फराजने "सिद्धार्थ सर सुखरूप आहे काळजी करण्याची गरज नाही" असे सांगून फोन कट केला.
याच फोनमुळे सर्फराज पोलिसांच्या आयता जाळ्यात सापडला. सर्फराजकडे केलेल्या चौकशीतून त्याने संघवीच्या हत्येची कबुली पोलिसांना तसंच न्यायालयात दिली आहे. त्याच बरोबर पोलिसांनी हस्तगत केलेल्या संगवी यांच्या गाडीवर सर्फराज याच्या हाताचे ठशे, संघवी यांच्या रक्ताचे शिंतोडे आढळून आले अाहेत. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा-
बेपत्ता एचडीएफसी बँकेच्या अधिकाऱ्याची हत्या
महिलांच्या डब्यात घुसून तरूणाचे अश्लिल चाळे, तक्रार दाखल करण्यास पोलिसांचा नकार