‘थेगिडी’, ‘हे सिनामिका’ यांसारख्या चित्रपटांमध्ये कॉमेडी आणि खलनायकी भूमिका साकारणारा तमिळ अभिनेता प्रदीप के. विजयन बुधवारी त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला.
दोन दिवस कोणताच संपर्क न झाल्याने प्रदीपचा एक मित्र त्याच्या घरी त्याला भेटायला गेला, तेव्हा त्याला प्रदीप मृतावस्थेत आढळला. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून प्रदीपच्या मृत्यूचं कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
प्रदीपच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. प्रदीप अविवाहित होता आणि चेन्नईमधील पलवक्कम परिसरातील संकरपुरम फर्स्ट स्ट्रीट याठिकाणी एकटाच राहत होता. काही दिवसांपूर्वीच त्याला श्वास घेण्यास त्रास आणि चक्कर आल्यासारखं जाणवत होतं. प्रदीपचा मित्र त्याला दोन दिवसांपासून फोन करत होता. मात्र अनेकदा फोन करूनही न उचलल्याने मित्र त्याच्या घरी गेला.
प्रदीपच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. त्याच्या मित्राने वारंवार दार ठोठावून पाहिलं, मात्र आतून काहीच उत्तर मिळालं नाही. अखरे त्याने पोलिसांनी याविषयीची खबर दिली. त्यावेळी निलंकराई पोलीस हे अग्निशमन दलासह प्रदीपच्या घराजवळ पोहोचले आणि त्यांनी त्याच्या घराचं दार तोडलं. दार तोडून पाहिल्यास घरात प्रदीप मृतावस्थेत आढळला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. पोलिसांनी त्याच्या मृतदेहाला रोयापेट्टा सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेलं आहे.
प्रदीप नायर पप्पू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदीपने 2013 मध्ये ‘सोन्ना पुरियातू’ या चित्रपटाद्वारे तमिळ सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ‘थेगिडी’ या चित्रपटात पूर्नाचंद्रनची भूमिका साकारल्यानंतर त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तो डिटेक्टिव्हच्या भूमिकेत होता. मात्र त्याच्या विनोदांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. 2023 मध्ये ‘रुद्रन’ या चित्रपटात तो अखेरचा झळकला होता. प्रदीप हा टेक ग्रॅज्युएट होता, मात्र अभिनयावरील प्रेमामुळे त्याने कॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.
हेही वाचा