भीमा-कोरेगाव येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत आंबेडकरी समुदाय रस्त्यावर उतरल्यामुळे महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त मिळाला. मुंबईत काही ठिकाणी अांदोलकांनी कायदा हातात घेत या अांदोलनाला हिंसक वळण दिलं. मुंबईत जवळपास ९० बस फोडण्यात अाल्या. कायदा हातात घेणाऱ्या १५० पेक्षा जास्त अांदोलकांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरात तोडफोड, हिंसाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचं मुंबई पोलिस प्रवक्ते सचिन पाटील यांनी सांगितलं.
भारिप बहुजन महासंघ अाणि २५० पेक्षा अधिक डाव्या संघटनांनी बंदची हाक दिल्यानंतर मंगळवारी रात्रीपासूनच पोलिसांनी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. घाटकोपर, चेंबूर, गोवंडी, पवई, वरळी, सायन, अंधेरी, गोरेगाव, दहिसर या ठिकाणी अांदोलनकर्त्यांनी कायदा हातात घेतल्याचे प्रकार पुढे अाले. चेंबूरमध्ये अज्ञात इसमांनी दोन स्कूलबसची तोडफोड केल्यानंतर वातावरण अाणखी चिघळले. त्यानंतर प्रतीक्षानगर, वरळी नाका, पवई, सांताक्रूझच्या मोतीलाल नगर अाणि इतर ठिकाणी ९० बसची तोडफोड करण्यात अाली. यांत ४ वाहनचालकही जखमी झाले.
अांदोलनादरम्यान काही ठिकाणी पोलिसांवरही दगडफेकीचा प्रकार समोर अाला अाहे. काही अांदोलनकर्त्यांनी पत्रकारांशी गैरवर्तणूक केल्याच्या घटनाही घडल्या अाहेत. याप्रकरणी पोलिसांनी कायदा हातात घेणाऱ्या १५० जणांना ताब्यात घेतलं असले तरी अन्य अांदोलनकर्त्यांची सीसीटीव्हीच्या माध्यमातून अोळख पटवून त्यांच्यावरही कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. रेल रोको करून प्रवाशांना वेठीस धरणाऱ्यांवरही रेल्वे पोलीस गुन्हा नोंदवणार असल्याचं रेल्वे पोलिसांनी सांगितलं.