बिग बाॅस रियालिटी शोमधील वादग्रस्त स्पर्धक जुबेर अली खान याला खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी रात्री अटक केली. वांद्रे येथील सामाजिक कार्यकर्त्या महिलेला १ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अभिनेता सलमान खान याच्यावर बेछूट आरोप केल्यानंतर जेव्हा झुबेरची बिग बाॅसमधून हाकालपट्टी करण्यात आली त्यावेळेस ही महिला झुबेरच्या बाजूने उभी राहिली होती. परंतु कालांतराने त्यांच्या मतभेद निर्माण झाले.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिमची बहिण हसिना पारकरचा जावई असल्याचं सांगून झुबेरने बिग बॉस ११ मध्ये प्रवेश मिळवला होता. मात्र, त्याचा हा दावा खोटा ठरल्यानंतर त्याला शो मधून काढण्यात आलं. त्यावेळी अभिनेता सलमान खानसोबतही त्याचा वाद झाला होता. यावेळी झुबेरची परिचीत वांद्रे इथं गारमेंट, सिक्युरिटी एजन्सी आणि सामाजिक संस्था चालवणारी ३१ वर्षीय तक्रारदार शबनम शेख ही महिला झुबेरच्या बाजूने उभी राहिली होती. ही महिला गरजूंना कायदेशीर मदत देण्याचंही काम करते.
पण, कालांतराने झुबेर आणि तक्रारदार महिलेत वादविवाद झाल्यानंतर तिला पाकिस्तानमधून १ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी ३ कॉल आले. ३ दिवसांत पैसे दिले नाही, तर ठार मारण्याची धमकी शबनमला दाऊद आणि छोटा शकिलच्या नावे देण्यात आली होती. यावर महिलेने ३ नोव्हेंबर २०१७ रोजी खार पोलिस ठाण्यात तक्रार केली.
हे प्रकरण खंडणीविरोधी पथकाकडे सोपवण्यात आल्यानंतर पथकाने तपासाला सुरूवात केली. पथकाच्या तपासात ३ पैकी २ फोन पाकिस्तानमधून उस्मान चौधरी याने, तर एक फोन दिल्लीतून हरिश यादव (३०) ने केला होता. त्यानुसार पोलिस पथकाने हरिषचा माग काढत त्याला १९ डिसेंबर रोजी दिल्लीतून अटक केली.
हरिशच्या चौकशीतून नवनवे खुलासे पुढे येऊ लागले. हरिशने आपण सराईत गुन्हेगार बिलाल कुतूबुद्दीनच्या सांगण्यावरून धमकी दिल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी वांद्रे इथून बिलालला अटक केली. त्यानंतर बुधवारी खंडणी विरोधी पथकाने पंजाबचा शूटर जगबीरला १ पिस्तुल, २ मॅगझीन आणि ४ जीवंत काडतुसांसह अटक केली. त्याच्यासोबत संतोष सिंगही आणि रहुल अमील मो. शमसुल इस्लाम (२४) देखील पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्या चौकशी झुबेरने सोशल मीडियावरून तक्रारदार महिलेल्या हत्येची सुपारी दिल्याचं सांगितलं.
त्यानुसार पोलिसांनी झुबेरला शुक्रवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल फोन व सीमकार्ड जप्त केलं आहे. झुबेरला न्यायालयापुढे हजर केलं असता त्याला २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान बिलालच्या चौकशीतून शार्पशूटर जगबीर आणि फहिम मचमच, उस्मान चौधरी, दाऊद इब्राहिम आणि छोटा शकिल यांची नावे पुढे लागली असली, तरी त्यांचा अद्याप तरी याप्रकरणी सहभाग स्पष्ट झालेला नाही. संबंधीत व्यक्ती फहिम मचमचमच्या नावाचा वापर करत असल्याचाही पोलिसांना संशय आहे. सध्या या प्रकरणी चौकशी सुरू आहे.