कुलाब्यातील कुपरेज गार्डनमध्ये घोड्यावरून पडून ६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर कुलाबा पोलिसांनी या घोड्याला वैद्यकीय तपासणीसाठी परळच्या बाई सकरबाई दिनशॉ पेटिट पशू रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. या घोड्याची वैद्यकीय चाचणी सुरू असल्याची माहिती रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर जे. सी. खन्ना यांनी दिली.
रविवार ५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास कूपरेज गार्डनमध्ये घोडेस्वारी करताना ६ वर्षांची जान्हवी मिस्त्री अचानक घोड्यावरून खाली पडली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिला तत्काळ बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी घोडाचालक सोहन जैस्वाल (३०) याला कुलाबा पोलिसांनी भादंवि ३०४ (सदोष मनुष्यवध) आणि २७९ (निष्काळजीपणे गाडी/ घोडा चालवणे) कलमांतर्गत अटक केली असून गुरुवारपर्यंत सोहन कुलाबा पोलिसांच्या ताब्यात आहे. घोड्याचा पाय लचकल्याने त्यावर बसलेली जान्हवी खाली पडल्याचं म्हटलं जात असलं, तरी हा अपघात घोडा चालकाच्या चुकीमुळे नाही तर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झाल्याचा दावा सोहनच्या वकिलांनी केला.
गडद तपकीरी रंगाच्या या घोड्याचं नाव बाजीराव असून या घोड्याची उंची साधारण ५ फूट आहे. त्याचं वय साडेतीन वर्षे असून हा घोडा काठेवाडी जातीचा आहे. रुग्णालयात घोड्यावर उपचार करण्यात येत असले, तरी वरवर पाहता 'बाजीराव' ठणठणीत असल्याचं दिसत आहे.
हा घोडा आमच्या रुग्णालयात आला असून आम्ही त्याची सगळ्याप्रकारे चाचणी करणार आहोत. त्याचं रक्त याआधीच तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. येत्या १० ते १५ दिवसांत चाचणी पूर्ण झाल्यावर आम्ही आमचा अहवाल कुलाबा पोलिसांना देणार आहोत.
- जे. सी. खन्ना, संचालक, बाई सकरबाई दिनशॉ पेटिट पशू रुग्णालय
हेही वाचा -
घोड्यावरून पडून सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू