करोना रोखण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या मुंबई पोलिस दलातील लागण वाढत चालली आहे.कोरोनाच्या लढाईमध्ये पोलिस दल अत्यंत कठीण परिस्थितीत काम करत आहे. असे असतानाही कुठलिही अपेक्षा न करता नागरिकांना सुविधांची कमी पडू नये, म्हणून कोरोना बाधित पोलिस रुग्णांसाठी पोलिसांनीच अंधेरी आणि सांताक्रूझ वसाहतींमध्ये 550 बेड असलेलं कोविड सेंटर सुरू केलं आहे. त्याच बरोबर गृह विभागाने कोरोनाबाधित पोलिस रुग्णांवर उपचारासाठी मुंबईतील दोन रुग्णालयं राखीव ठेवलेली आहेत.
मुंबईतील कोरोना बाधीत पोलिसांचा आकडा 250 च्या वर गेला आहे. तर राज्यात 71 अधिकारी आणि 547 पोलिसांना कोरोना झाला आहे. दिवसेंदिवस या आकड्यात भर पडत आहे. त्यामुळेच पोलिसांची कोणतीही गैरसोय होऊ नये, तसेच नागरिकांना शासनाने केलेली व्यवस्था कमी पडू नये, म्हणून पोलिसांनीच त्यांच्या सांताक्रूझ आणि अंधेरी मरोळ येथील मोकळ्या वसाहतीत 550 बेडचे विशेष कोविड सेंटर्स सुरू केलं आहे. या सेंटर ठिकाणी तज्ञ डाँक्टरांच्या देखरेखीखाली कोरोना बाधित पोलिसांना ठेवले जाणार असल्याची माहिती सूञांनी दिली आहे.
सांताक्रुझ वसाहतींमध्ये 300 खाटांची सुविधा असलेलेले सेंटर उभारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या दोन्ही वसाहतीगृहात लक्षण नसलेल्या कोरोना बाधीत पोलिसांना ठेवण्यात येणार आहे. तसेच पोलिस व त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष कोविड हेल्पलाईन पोलिस आयुक्तलयात सुरू करण्यात आली आहे. त्यावर बहुतांश पोलिस व कुटुंबियांनी रुग्णालयात भरती करण्यात येणा-या अडचणीबाबत तक्रार केल्या होत्या. त्यामुळे पोलिसांना अशा अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी हे सेंटर सुरू करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. तर पोलिस ठाण्याच्या पातळीवर मुंबईबाहेर राहणा-या पोलिसांची राहण्याची सुविधा करण्याबाबतही प्रक्रिया सुरू असून पोलिस ठाण्यात तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
हे सेंटर्स तयार करण्यासाठी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी विशेष पुढाकार घेतल्याचे अधिका-याने सांगितले. ऐवढच नाही तर नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांना मदत म्हणून आता शहरातून जण मदत करत आहे. नुकतीच गोदरेज समूहाचे चेअरमन पिरोजशा आदि गोदरेज यांनी मुंबई पोलिस फाऊंडेशन करिता 25 लाखांची मदत जाहिर केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.