मुंबईतल्या प्रसिद्ध फायनान्स कंपनीला 7 कोटींचा चुना


मुंबईतल्या प्रसिद्ध फायनान्स कंपनीला 7 कोटींचा चुना
SHARES

मुंबईतल्या प्रसिद्ध फायनान्स कंपनीला 7 कोटींचा चुना लावणाऱ्या तिघांना पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आंध्रप्रदेशहून अटक केली आहे. या फायनान्स कंपनीने नेमलेल्या ए स्टार ऑटो या रिव्हेन्यू शेअरिंग पार्टनर्स कंपनीच्या मालकाने कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ही फसवणूक केल्याचं तपासात उघड झालं आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आंध्र प्रदेशमध्ये विविध ठिकाणी छापेमारी करून शमीर (40), मोहम्मद अब्दुल शमीर (34) आणि थोगाटा नागाराजू(38) यांना अटक केली. 


संपूर्ण प्रकार

मुंबईत फॉर्च्यून अॅसेट ही फायनान्स लि. कंपनी विविध योजनांतर्गत नवीन किंवा वापरातील मालवाहू किंवा प्रवासी वाहने खरेदी करण्यासाठी गरजूंना आर्थिक मदत करते. 2016 मध्ये या कंपनीने वाहनांसाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी ए स्टार या कंपनीची रिव्हेन्यू शेअरिंग पार्टनरर्स म्हणून नेमणूक केली होती. ही कंपनी नागरिकांना मिळणारी सर्व आर्थिक मदत ही कागदपत्रांची खातरजमा करून घेण्याचं काम करायची.


इतक्या रुपयांची फसवणूक

ए स्टार या कंपनीचे मालक आरोपी तिरूमली शमीर थख याने फॉर्च्युन अॅसेट या फायनान्स लि. कंपनीच्या आंध्रमधील कर्मचारी पी.शीव नागाराजू, एम.डी.शकीर आणि अन्य साथीदारांसह जून 2016 ते नोव्हेंबर 2016 या कालावधीदरम्यान फॉर्च्यून अॅसेट कंपनीकडून आर्थिक मदत मिळालेल्या 457 गरजूंचा डेटा मिळवला. यातील 287 गरजूंची बनावट कागदपत्रे बनवून या टोळीने कंपनीकडून 6 कोटी 30 लाख रुपये उकळले. फसवणूक झालेल्या आर्थिक मदत प्रकरणांपैकी 86 कर्ज प्रकरणांमध्ये एस्टार ऑटो फायनान्स एजन्सीने कंपनीला दहा टक्के सहभाग रक्कम परतसुद्धा केली. मात्र त्यातील एकही इएमआय कंपनीला न भरता या टोळीने कंपनीला 77 लाख 46 हजार 320 रुपयांना चूना लावला.


आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार

कंपनीच्या ऑडीटवेळी ही फसवणूक उघडकीस आल्यानंतर कंपनीने मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखाकडे लेखी तक्रार नोंदवली. पोलिस तपासात या आरोपींचा सहभाग निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी त्या आरोपींभोवती फास आवळण्यास सुरुवात केली. पोलिसांनी आंध्र प्रदेशमध्ये विविध ठिकाणी छापेमारी करून तीन आरोपींना अटक केली. या प्रकरणात एकाच वाहनांवर या टोळीने वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतल्याचंही पुढे आलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा