गोरेगाव - पाचशे, हजारच्या जून्या नोटा बदलायच्यात. मग बँकेतच जा. कुणी पैसे बदलून देतो हे सांगितल्यास त्यावर विश्वास ठेवू नका. कारण नोट बदली करून देण्याच्या नावाखाली एका व्यावसायिकाला कागदाचे कपटे देण्यात आले. या प्रकरणी वनराई पोलिसांनी मध्यस्थी करणाऱ्या देसाईला अटक केलीय. तर त्याचा साथीदार मात्र फरार आहे.
अजय केजरीवाल या व्यापाऱ्याला सहा लाख तीस हजारांची रोकड नव्या नोटांमध्ये बदलायची होती. त्यासाठी त्यांनी अजय देसाई नामक एका इसमाशी संपर्क साधला. तेव्हा त्यानं पन्नास हजार रुपये कमिशन घेण्याच्या अटीवर केजरीवाल यांचे पैसे बदलून देण्याची तयारी दर्शविली.
त्यानुसार सोमवारी दुपारी गोरेगावच्या वीरवाणी इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरात केजरीवाल हे पैसे घेऊन पोहोचले. दोघांनी पैशांच्या बॅगेची अदलाबदली केली. पण केजरीवाल बॅग उघडून पैसे तपासू लागले, तेव्हा पैसे घरी जाऊन मोजा, अन्यथा पोलीस आपल्याला पकडतील, असं अजयनं सांगितलं. केजरीवाल यांनी घरी आल्यावर पैशांची बॅग तपासली तेव्हा त्यांना धक्काच बसला. बंडल्समध्ये वर आणि खाली शंभरची नोट आणि मध्ये अक्षरश: कागदाचे तुकडे होते. केजरीवाल यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार केली.