६ महिन्याच्या बाळाची चोरी करुन विकण्याचा प्रयत्न, ५ जणांना अटक

विशेष म्हणजे हिनाने याआधी टेस्टट्यूब बेबीने बाळाला जन्म दिला होता. हे बाळ तिने साडे पाच लाख रुपयात विकलं होतं. यावेळी तिने टेस्टट्यूब बेबीचा प्रयोग न करता बाळ चोरून ते विकायचं असं ठरवलं होतं.

६ महिन्याच्या बाळाची चोरी करुन विकण्याचा प्रयत्न, ५ जणांना अटक
SHARES

सहा महिन्याच्या बाळाची चोरी (6 Months baby ) करून विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५ जणांच्या टोळीला कल्याण (kalyan) मधील महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. या टोळीमध्ये २ महिलांचा समावेश आहे. आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कल्याणमधील मोहम्मद अली चौकातील शिवमंदिराजवळ फूटपाथवर सुनिता राजकुमार नाथ ही महिला सहा मुलांना घेऊन झोपली होती. त्यापैकी तिचा सगळ्यात लहान असलेला सहा महिन्यांचा मुलगा जिवा याची चोरी झाली. सुनिताने महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार नोंदवली. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संभाजी जाधव, पोलीस अधिकारी प्रकाश पाटील, दीपक सरोदे आणि ढोले यांच्या पथकाने या  बाळाचा शोध सुरु केला.

सीसीटीव्हीत दोन चोरटे या बाळाला घेऊन जात असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज वरून माहिती घेत कल्याणातील पत्री पूल आणि दिवा येथून पाच अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतलं. विशाल त्र्यंबके, कुणाल कोट, फरहान अब्दुल माजिद आणि आरती कोट, हिना फरहान माजिद अशी या आरोपींची नावं आहेत. आंबिवलीत राहणारा आरोपी विशाल त्र्यंबके आणि दिव्यात राहणारा आरोपी कुणाल कोट यांनी त्या बाळाची चोरी केली होती.

काही दिवस हे बाळ आरोपी कुणाल कोट याच्या पत्नी आरतीकडे होतं. त्यानंतर बाळाला भिवंडीत राहणाऱ्या हिना मजीद आणि फरहान मजीद या जोडप्याला देण्यात आलं. त्यांनी तरुणांना बाळाच्या बदल्यात एक लाख रुपये देण्याचे ठरवले होते. यातील ४० हजार रुपयांची रक्कम आरोपींनी घेतली होती. 

पोलिसांनी हिनाची चौकशी केल्यावर तिने उडवाउडवीचं उत्तरं दिली. सुरुवातीला तिने मुलगा नसल्याने त्याला दत्तक घेतल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे हिनाने याआधी टेस्टट्यूब बेबीने बाळाला जन्म दिला होता. हे बाळ तिने साडे पाच लाख रुपयात विकलं होतं. यावेळी तिने टेस्टट्यूब बेबीचा प्रयोग न करता बाळ चोरून ते विकायचं असं ठरवलं होतं. दोघे मुंबईत नेमकं कोणत्या दांपत्याला हे बाळ विकणार होते याचा तपास पोलीस करत आहेत.



हेही वाचा -

मालाडमध्ये इमारत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, १७ जण जखमी

Mumbai rains: १३ जूनपर्यंत मुंबई, कोकणात अतिवृष्टीचा इशारा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा