जगातील सर्वात क्रूर अशी ओळख असलेल्या 'इसिस' या दहशतवादी संघटनेने घातपात घडवून आणण्यासाठी हत्यार किंवा स्फोटकाचा वापर न करता मोठी दुर्घटना घडवून आणण्याचा कट रचल्याची माहिती मल्टी एजन्सी सेंटर (मॅक)ने सर्व सुरक्षा विभागांना दिली आहे. रेल्वे रूळ कमकुवत करून भीषण दुर्घटना घडवून आणण्याचा कट 'इसिस'ने रचल्याची माहिती 'एटीएस'च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
शहरात लाखो नागरिक दररोज रेल्वेने प्रवास करतात. त्या तुलनेत रेल्वेची सुरक्षा अत्यंत तोकडी आहे. या पूर्वीही रेल्वेत साखळी बाॅम्बस्फोट होऊनसुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठोस उपाययोजना झालेली नाही. याच गोष्टीचा फायदा उचलत कोणतंही हत्यार किंवा स्फोटकांचा वापर न करता दहशतवाद्यांनी रेल्वे रूळ कमकुवत करून दुर्घटना घडवण्याचा दहशत वाद्यांचा कट असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांकडून मिळाली आहे.
उन्हाळ्यात लोखंड गरम होऊ ते किंचीत प्रसरण पावतं, तर हिवाळ्यात आकसत असल्याने रेल्वे रूळ एकमेकांना जोडताना त्यात इंचभर जागा सोडण्यात येते. याच इंचभर जागेत सिमेंट किंवा दगड टाकल्यास रूळ वाकडे होऊन दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने घातपाताची ही नवी पद्धत दहशतवाद्यांनी शोधून काढली आहे.
दहशतवाद्यांच्या या पद्धतीची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाल्यानंतर त्यांनी रेल्वे सुरक्षा विभागांना सतर्क राहण्याचे आदेश देत, रेल्वे स्थानक, रूळ परिसर आणि गोडाऊनमध्ये गस्त वाढवण्याचे निर्देशा दिले आहेत. आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांना रेल्वे रूळातील गडबड कळणं कठीण असल्याने अशा ठिकाणी कायमस्वरूपी तपास अधिकारी अर्थात 'पर्मनंट व्हे इन्स्पेक्टर' (पीडब्ल्यूआय) गॅगमन्सची नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्यासोबत क्यूआरटीचे जवान शस्त्रासह महत्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. तर श्वान पथकांनाही रेल्वे स्थानक आणि रेल्वे रूळांवर घेऊन फिरवण्याचे आदेश दिले आहेत.
पुण्यात 'इसिस'च्या संपर्कात आलेल्या १६ वर्षीय मुलीला २०१५ मध्ये महाराष्ट्र 'एटीएस'ने ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी 'एटीएस' अधिकाऱ्यांनी तिचं समुपदेशन करून तिला 'इसिस'च्या जाळ्यातून बाहेर काढल्याचा दावा केला होता. मात्र त्या मुलीला पोलिसांनी पकडल्यास त्यांचा तपास भरकटवण्याचं प्रशिक्षणही 'इसिस'ने दिलं होतं.
'इसिस'ने या मुलीला नुकतीच मानवी बाॅम्ब बनून जम्मू काश्मिरमध्ये घातपात घडवून आणण्यासाठी पाठवलं होतं. मात्र वेळीच सुरक्षा यंत्रणांनी तिचा डाव ओळखत तिला ताब्यात घेतलं. चौकशीत ती पुण्याची असून या पूर्वीही 'इसिस'ने तिला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचं पुढे आल्याने 'एटीएस'ची झोप उडाली आहे. मात्र पुण्याची मुलगी दुसरी असावी. काश्मिर पोलिसांनी संबधित मुलीबाबत कोणतीही माहिती मागितली नसल्याचं पुण्याचे सह आयुक्त रमेश कदम यांनी सांगितलं.
हेही वाचा-
शिवाजी पार्कच्या प्रजासत्ताक सोहळ्यात आत्मदहनाचा प्रयत्न, तिघांना घेतलं ताब्यात