लोकल विनयभंग प्रकरणाचा अहवाल सादर करा, महिला आयोगाचे रेल्वे पोलिसांना आदेश


लोकल विनयभंग प्रकरणाचा अहवाल सादर करा, महिला आयोगाचे रेल्वे पोलिसांना आदेश
SHARES

अवघ्या २४ तासांत मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये दोन विनयभंगाच्या घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेची राज्य महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी याप्रकरणी रेल्व पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश रेल्वे पोलिसांना सोमवारी दिले आहेत.


कुठल्या घटना?

शनिवारी धावत्या लोकलमध्ये २३ वर्षीय तरूणीसमोर अश्लील चाळे करत एका विकृताने या तरूणीचा विनयभंग केला. ही घटना ताजी असतानाच रविवारी छेडछाडीचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला घाबरून १४ वर्षीय विद्यार्थीनीने धावत्या लोकलमधून उडी मारली. या दोन्ही घटनांनी मुंबई हादरली आहे.


अतिशय गंभीर बाब

यापैकी अश्लील चाळे करणाऱ्या विकृत व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. तर १४ वर्षीय विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्याचा शोध रेल्वे पोलीस घेत आहेत. या दोन्ही घटना अत्यंत गंभीर असून लोकलमध्ये महिला असुरक्षित असल्याचेच यावरून स्पष्ट होत असल्याचे म्हणत महिला आयोगाने रेल्वे पोलिसांना यासंबंधीच्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.


या दोन्ही घटनांप्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली? याचा अहवाल आम्ही मागवला आहे. तर दुसरीकडे महिलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने रेल्वे प्रशासनाने नेमक्या काय उपाययोजना केल्या आहेत? याचाही आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर महिला आयोगाकडूनही आवश्यक त्या उपाययोजना सुचवण्यात येतील.
- विजया रहाटकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग



हेही वाचा -

छेडछाडीच्या भितीने ‘तिने’ धावत्या लोकलमधून मारली उडी, आरोपीचा शोध सुरू

धावत्या लोकलमध्ये अश्लील चाळे करणाऱ्याला अटक


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा