मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गजबजलेले स्थानक म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकात चक्क मटक्याचे अड्डे सुरू होते. ही माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.
कल्याणच्या दिशेला फलाट क्र. 1 येथे रेल्वेच्या हद्दीत बेकायदा मटका अड्डे आणि व्हिडीओ पार्लर सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिंदे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या मटक्याच्या अड्ड्यांकडे रेल्वे प्रशासन आणि लोहमार्ग पोलीस कानाडोळा करत असल्याचे चित्रही या निमित्ताने सर्वांसमोर आले.
खासदारांच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही अड्डे शिवसैनिकांनी बंद पाडले. त्यानंतर शिंदे यांनी डोंबिवली स्थानकाचे स्टेशन मास्तर, जीआरपी आणि आरपीएफच्या अधिकाऱ्यांना मटक्याचे अड्डे आणि व्हिडीओ पार्लर ताबडतोब सील करण्यास सांगितले. तसेच लोहमार्ग पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौरीप्रसाद हिरेमठ यांना बोलावून या अड्ड्यांकडे दुर्लक्ष करणारे आरपीएफचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिश्रा, जीआरपीचे सहायक पोलीस निरीक्षक डोळे आणि स्टेशन मास्तर ओ. पी. करोठिया यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले.