लोकलमध्ये रोज कुणाची ना कुणाची भांडणं आपण पाहातो. कधी ती उभं रहाण्यासाठीच्या जागेवरून असतात, कधी बसण्याच्या जागेवरून, तर कधी चढताना किंवा उतरताना लागलेल्या धक्क्यावरून असतात. पण कधीकधी ही भांडणं इतकी टोकाला जातात की प्रकरण मारहाणीपर्यंत येतं. असाच एक धक्कादायक प्रकार पश्चिम रेल्वेच्या एका लोकमध्ये घडला आहे.
रविवारी रात्री १൦ वाजून १८ मिनिटांच्या सुमारास चर्चगेट वरून सुटून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या जनरल डब्यात चौथ्या सीटवर बसण्याच्या कारणावरून मारहाणीची घटना घडली आहे. या मारहाणीत संबंधित प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
चर्चगेटवरून ही लोकल रात्री १० वाजून १८ मिनिटांनी विरारच्या दिशेने निघाली. मात्र, लोकल मीरारोड स्टेशनला पोहोचताच एका जनरल डब्यात राडा सुरू झाला. डब्यातल्या एका सीटवर तिसऱ्या जागी महिला प्रवासी बसली होती. मात्र, या महिला प्रवाशाला आत सरकून चौथ्या सीटवर बसण्याचा प्रयत्न एक पुरूष प्रवासी करत होता.
महिला प्रवासी बसलेली असतानाही चौथ्या सीटवर बसण्याचा आग्रह धरणाऱ्या या प्रवाशाला संबंधित महिलेच्या सहकाऱ्यांनी आणि डब्यातल्या इतर प्रवाशांनी जाब विचारण्यास सुरूवात केली. या वादाचं रूपांतर बाचाबाचीत झालं..आणि लवकरच बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीत झालं.
ही गाडी मीरारोड स्टेशनवर येताच प्रवाशांमध्ये हाणामारी सुरू झाली. हा सगळा प्रकार पाहून आजूबाजूचे प्रवासीही काही काळ गोंधळून गेले. प्रवाशांच्या मध्यस्थीचा परिणाम होत नव्हता. या प्रकारादरम्यान डब्यातल्या इतर महिला प्रवाशांनाही धक्काबुक्की झाली. अखेर काही काळानंतर इतर प्रवाशांनी आक्रमकपणे मध्यस्थी करत ही हाणामारी थांबवली. दरम्यान, या हाणामारीमध्ये संबंधित प्रवाशाच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.
हेही वाचा