परळमधील मटका केंद्राचा 'घडा' भरला

परळच्या मटका केंद्रावरून दिवसाला ९ लाखांची कमाई व्हायची. तर आठवड्याला कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत होती. मात्र नुकत्याच केलेल्या कारवाईत पोलिसांनी ३४ जणांना अटक केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर मटका केंद्राचा 'घडा' भरल्याच्या प्रतिक्रिया स्थानिकांनी दिल्या.

परळमधील मटका केंद्राचा 'घडा' भरला
SHARES

परळच्या भोईवाडा परिसरात पोलिसांच्या मूक संमतीने सुरू असलेल्या मटका केंद्रावर अखेर पोलिसांच्या विशेष पथकाने शनिवारी कारवाई केली. परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत मुंबई पोलिस आयुक्तांनी जाहीररित्या कान उपटूनसुद्धा स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. या मटका केंद्रावरून दिवसाला ९ लाखांची कमाई व्हायची. तर आठवड्याला कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत होती. मात्र नुकत्याच केलेल्या कारवाईत पोलिसांनी ३४ जणांना अटक केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर मटका केंद्राचा 'घडा' भरल्याच्या प्रतिक्रिया स्थानिकांनी दिल्या.


पोलिसांची मूक संमती

परळच्या आईमेरवानजी रोडवरील एका गल्लीत जुगाऱ्यांनी मटक्याचा अवैध धंदा सुरू केला. दिवसेंदिवस या ठिकाणी मटका खेळायला येणाऱ्यांची गर्दी वाढतच होती. या जुगाऱ्यांचा नाहक त्रास स्थानिकांना होत असल्याने त्यांनी पोलिसांना याबाबत अनेकदा तक्रारी केल्या. मात्र पोलिसांच्या मूक संमतीने हा अवैध धंदा सुरू असल्याने मटका केंद्रावर कारवाई होत नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं होतं.



आयुक्तांकडून कानउघडणी

भोईवाडा आणि आरएके पोलिस ठाण्याच्या परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत होत्या. याबाबत नुकत्याच झालेल्या 'क्राइम काॅन्फरन्स'मध्ये मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दोन्ही पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना हे अवैध धंदे बंद करण्याची ताकीद दिली होती.

मात्र आयुक्तांच्या ताकिदीनंतरही परिसरात मटका केंद्र सर्रास सुरू होतं. याबाबत स्थानिकांनी आयुक्तालयात तक्रार केल्यानंतर या अवैध मटका केंद्रावर कारवाई करण्यासाठी आयुक्तांनी विशेष पथकाची नेमणूक केली. या कारवाईची जबाबदारी सायन विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र त्रिवेदी यांच्यावर सोपवली.


असा रचला सापळा

परळच्या या मटका केंद्रावर कारवाई करणं तितकसं सोपं नव्हतं. कारण कारवाईसाठी निघालेल्या पोलिसांची माहिती क्षणार्धात जुगाऱ्यांपर्यंत पोहोचायची. विशेष म्हणजे पोलिसांनी कारवाई केली. तरी ग्राहकांना पळण्यासाठी या जुगाऱ्यांनी मटका केंद्रावर छुपा दरवाजा बनवला होता. त्यामुळे पोलिस आले, तरी जुगारी मागच्या दरवाजाने पळून जायचे.

त्यामुळे कारवाई करण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. कारवाई करण्यापूर्वी ४ दिवस पोलिस साध्या वेशात मटका केंद्रावर जुगार खेळण्याच्या नावाखाली जाऊन रेकी करत होते. शनिवारी देखील पोलिसांनी रेकी करून सापळा रचला. त्यानुसार शनिवारी सकाळी त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई करत ३४ जणांसह ४५ हजार रुपयांची रोख आणि इतर साहित्य हस्तगत केलं आहे.


कोट्यावधी रुपयांची उलाढाल

पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर तपासात दिवसाला या मटका केंद्रावरून अंदाजे ९ लाख रुपयांचा जुगार खेळला जात असल्याचं उघडकीस आलं आहे. तर आठवड्याला अंदाजे कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्याने या प्रकरणाची व्याप्ती किती आहे, हे लक्षात येईल असं विशेष सूत्रांनी सांगितलं.



हेही वाचा-

गुंगीचं औषध पाजून तरुणीवर बलात्कार, गुजरातच्या व्यावसायिकाला अटक

पीडित मुलांना पोलिस ठाण्यात बोलावतातच कसं? पोक्सोप्रकरणी न्यायालयानं पोलिसांना झापलं



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा