वडाळा - चार सराईत घरफोड्यांना वडाळा पोलिसांनी जेरबंद केले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून वडाळा टीटी परिसरात या घरफोड्यांच्या टोळीने धुमाकूळ घातला होता. अमजदअली हुसेन शेख (24), सद्दाम नूरमहंमद अन्सारी (24), मुतीन अहमद अब्दुल रजाक शेख (39), सलमान युनूस खान (22) अशी अटक करण्यात आलेल्या घरफोड्यांची नावे आहेत. ते वडाळा टीटी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. या टोळीकडून 13 घरफोड्यांतील लाखो रुपयांचा ऐवज वसूल करण्यात पोलिसांना यश आले.
एका खबऱ्याने सलमानवर संशय असल्याची माहिती दिली. त्यानंतर वडाळा पोलिसांनी सलमानला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारांची नावे सांगितली. माहिती मिळाल्यावर त्याच्या तीन साथीदारांनाही बेड्या ठोकल्या. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक संतोष नरुटे, प्रकाश लिंगे यांच्यासह पोलीस शिपाई सुहास भोसले, कुमार शेळके, तानाजी घेरडे, अरुण कारभळ, गणेश देशमुख, जमादार गजानन तांबडे यांनी भाग घेतला.