बनावट ताडीमाडीच्या विक्रीबाबतची माहिती उघड केल्याने तेलंगणातील माहिती अधिकाऱ्याची ९ मे रोजी हत्या करण्यात आली होती. या हत्येत एकूण १२ आरोपींचा समावेश होता. यामधील २ फरार आरोपींना गुन्हे शाखा क्रमांक-१ च्या अधिकाऱ्यांनी मुंबईतून अटक केली आहे. राजेश गौड एलिमती (४६) आणि राजय्या कसारप्पू (५१) अशी या आरोपींची नावं असूून हे दोघे मुंबईत राहत होते.
पोडेती सत्यनारायण नरसा गौड (५१) असं तेलंगणातील माहिती अधिकाऱ्याचं नाव आहे. गौड यांनी बनावट ताडीमाडीच्या विक्रीबाबतची माहिती माहिती अधिकाराखाली मागवून मुंबईतील राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यामुळे मुंबईतील अनेक ताडीमाडी केंद्र बंद करण्यात आले. यामुळं ताडीमाडी विक्रेत्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानं झालं होतं. त्यामुळं ताडीमाडी विक्रेत्यांनी गौड यांना मारण्याचा कट रचला आणि ९ मे रोजी हत्या केली.
गौड हे ९ मे रोजी धार्मिक विधीकरता तेलंगणा जिल्ह्यातील धर्मापुरी इथं गेले होते. त्यावेळी ताडीमाडी विक्रेत्यांनी रात्री १० वाजताच्या सुमारास अग्नीशस्त्रातून गोळीबार करून गौड यांची हत्या केली. याप्रकरणी धर्मापुरी पोलिसांनी १२ पैकी ९ मारेकऱ्यांना यापूर्वीच अटक केली होती. आता यामधील दोन आरोपी फरार होते. त्यांच्याविरोधात भा.दं.वि कलम ३०२, १२०(ब), ३४ सह ३, २५, २७ या भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
मात्र, गौड यांची हत्या करून फरार झालेले दोघे आरोपी मुंबईत ठिकाण बदलून राहत होते. याबाबत गुन्हे शाखा क्रमांक-१ च्या अधिकाऱ्यांना गोपनिय माहिती मिळाली होती. या महितीच्या आधारे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी राजेश गौड एलिमती याला वांद्रे येथील खेरनगर येथून तर राजय्या कसारप्पू याला जोगेश्वरी पुर्वेतील आनंदनगर परिसरातून अटक केली आहे.