अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात फॅशन डिझायनर सुनिता सिंग यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या लक्ष सिंग या त्यांच्या मॉडेल असलेल्या मुलाला न्यायालयाने 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पैशाच्या वादातून लक्षने आईला बाथरूममध्ये कोंडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी धक्काबुक्कीत सुनिता यांच्या डोक्याला मुक्कामार लागल्याचं लक्षने पोलिसांना सांगितलं.
लोखंडवाला परिसरातील क्राॅसगेट इमारतीत सुनाता या त्यांचा मुलगा लक्ष आणि त्याच्या प्रेयसीसोबत रहात होत्या. सुनीता यां फॅशन डिझायनर होत्या. तर लक्ष हा माॅडेल आहे. दोघे अंमली पदार्थांचे व्यसन करायचे. बुधवारी रात्री देखील दोघांनी व्यसन केल्यानंतर आर्थिक व्यवहारावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आईच्या आरडा ओरडाला कंटाळलेल्या लक्षने आईला बाथरूममध्ये कोंडण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी दोघांमध्ये झटापट सुरू झाली. दरम्यान लक्षने आईला बाथरूममध्ये जोराचा धक्का दिला. त्यावेळी तोल जाऊन सुनीता या बाथरूममध्ये पडल्या त्यावेळी त्यांच्या डोक्याला मुक्कामार लागला. मुक्कामार दुखत असल्यामुळे सुनीता या बाथरूममध्ये इवळत पडल्या होत्या. मात्र तरीही लक्षने बाथरूमचा दरवाजा न उघडता झोपून गेला.
नशा उतरल्यानंतर त्याने बाथरूमचा दरवाजा उघडून आईला जाग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेेळी ती प्रतिसाद देत नव्हती. जवळील रुग्णालयातील डाॅक्टरांना घरी बोलावल्यानंतर त्यांनी तिला मृत घोषित केलं. त्यावेळी आई पाय घसरून पडल्याचा बनाव त्याने रचला. मात्र पोलिसांनी त्याला फैलावर घेतल्यानंतर त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.