पवई - आॅनलाईन वेबसाईटचा वापर करून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं गुरूवारी रात्री पर्दाफाश केला. पोलिसांनी पवई परिसरातून पाच दलालांना अटक करत पाच मुलींची सुटका केली आहे. माय लोकेन्टो इन्फो या वेबसाईटवर टिन एस्कार्ट मुंबई एस्कार्ट वूमन मुंबई सीआॅफ मुंबई शुगर २२ नावाने आॅनलाईन जाहिरात देऊन हा वेश्याव्यवसाय सुरू होता. या वेबसाईटवर रिषी नामक व्यक्तीचा नंबर दिलेला होता. फोन केल्यानंतर मुंबईतील विविध ठिकाणच्या हाॅटेलमध्ये वेश्याव्यवसायासाठी मुली पुरवण्यात येत होत्या. याची माहीती मिळताच समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक पाठवून याची खात्री केली. त्यानंतर पवई परिसरातील रिलॅक्स इन हाॅटेल, सनसृष्टी कॉम्प्लेक्स, गुरूकृपा हाॅटेलजवळ, तुंगा गाव आणि साकी विहार रोड परिसरात रात्री साडेनऊच्या सुमारास सापळा रचून पाच दलालांसह पाच मुलींना ताब्यात घेतलं. पाचही मुलींची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली असून, पाच दलालांविरोधात पवई पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत पुढील तपास पवई पोलीस करत आहेत.