अवघ्या ३ मिनिटात गाडी चोरणाऱ्या सराईत आरोपीस गुन्हे शाखाच्या पोलिसांनी अटक केली आहे. हजरतअ फकरूद्दीन खान (३२) असं या आरोपीचं नाव आहे. आरोपीकडून पोलिसांनी ५ चोरीची वाहनं हस्तगत केली आहेत.
मुंबईतील रस्त्यांवरून प्रत्येक दिवसाला सरासरी ११ गाड्या चोरीला जात असतात. कुर्ला परिसरात राहणारा हजरतअली अवघ्या ३ मिनिटात बनावट चावीने कुठलीही कार चोरतो. पैशांच्या अडचणीमुळं चोरीचा मार्ग पत्करल्याचं मेकॅनिकचं काम करणाऱ्या हजरत अलीनं सांगितलं. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या पाच गाड्या हस्तगत केल्या आहेत. दादर पोलिस ठाणे परिसरात उभ्या असलेल्या टेम्पोची काही दिवसांपूर्वी त्याने चोरी केली होती. हा गुन्हा पुढे चौकशीसाठी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी हजरत अलीला कुर्लातून अटक केली.
मुंबईतून चोरण्यात येणाऱ्या कार मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, नोएडा, केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, कोलकाता, झारखंड, ओडिशा, आसाम व नेपाळमध्येही विकण्यात येतात. कार चोरी बाजारात तवेरा, स्कॉर्पिओ, बोलोरे, क्वालिस, पजेरो, मारुती, सँट्रो आदी गाड्यांना अधिक मागणी आहे. दिल्लीत दररोज सरासरी ४० गाड्या चोरीला जातात. त्यापाठोपाठ बंगळूरु आघाडीवर असून तेथे दिवसाला सरासरी १२ गाड्या चोरीला जात असल्याचं आकडेवारीतून दिसून येते.
हेही वाचा -
रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा : सव्वा लाख रुपये असलेली बॅग केली परत
भिंवडी दंगलीतील मुख्य सूत्रधाराला अटक