निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने आता कंबर कसली असून पुनर्मूल्यांकनासह हिवाळी सत्रातील परीक्षांचे निकाल लावण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. त्यानुसार पुनर्मूल्यांकनातील केवळ ४५२९ निकाल जाहीर होणे बाकी असून हे सर्व निकाल आठवड्याभरात लावले जातील, अशी ग्वाही विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डाॅ. देवानंद शिंदे यांनी दिली आहे. तर हिवाळी सत्रातील ४०२ अभ्यासक्रमांच्या परिक्षांच्या निकालांपैकी १२९ अभ्यासक्रमांच्या परिक्षांचे निकाल लावण्यात आले असून, आता केवळ २७३ अभ्यासक्रमांच्या परिक्षांचे निकाल बाकी आहेत. हे निकालही वेळेत लावले जातील, असंही डाॅ. शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबई विद्यापीठाने २०१७ मध्ये आॅनलाईन मूल्यांकनाचा (पेपर तपासणी) निर्णय घेतला आणि हा निर्णय विद्यापीठासह विद्यार्थ्यांनाही महागात पडला. आॅनलाईन मूल्यांकनात अनेक तांत्रिक अडचणी आल्यानं निकाल वेळेत लागलेच नाहीत आणि निकालाचा गोंधळ सुरू झाला. यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांची हकालपट्टीही झाली. आता हा सर्व गोंधळ निस्तरण्याचे काम विद्यापीठाकडून सुरू आहे.
दरम्यान, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डाॅ. अर्जुन घाटुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवाळी सत्रात अर्थात ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान ४०२ अभ्यासक्रमांसाठी परीक्षा झाल्या. या परीक्षेला ३ लाख ७६ हजार विद्यार्थी बसले होते. या विद्यार्थ्यांच्या १४ लाख ७ हजार ३५ उत्तरपत्रिका तपासणीसाठी उपलब्ध झाल्या होत्या. त्यानुसार यातील १० लाख ४९ हजार ३०३ उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. आता ३ लाख ५७ हजार ५३२ उत्तरपत्रिकांची तपासणी शिल्लक आहे. या कामाच्या अनुषंगाने ४०२ अभ्यासक्रमांच्या परीक्षांपैकी १२९ परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, आता २७३ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल शिल्लक आहेत.
शाखा निहाय या निकालांचा विचार करता सायन्स आणि टेक्नाॅलाॅजी विभागाच्या १९९ परिक्षांच्या निकालांपैकी ५५ परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून १४४ परीक्षांचे निकाल जाहीर होणे शिल्लक आहे. तर कॉमर्स आणि मॅनेजमेंट शाखेच्या ६६ परीक्षांच्या निकालांपैकी १५ निकाल जाहीर झाले असून ५१ परीक्षांचे निकाल शिल्लक आहेत.
आतापर्यंत पूर्ण करण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम १२ हजार ६१८ शिक्षकांनी पूर्ण केले असल्याची माहितीही घाटुळे यांनी दिली आहे.
हेही वाचा