केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवार १५ जुलै २०२० रोजी जाहीर (cbse class 10th results will declared on wednesday 14th july 2020) करण्यात येणार आहे. केंद्रीय मुनष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी यासंबंधी घोषणा केली. विद्यार्थ्यांना आपला निकाल cbse.nic.in , cbseresults.nic.in आणि results.nic.in या संकेतस्थळांवर पाहायला मिळेल.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावीच्या फेब्रुवारी ते मार्च दरम्यान सुरू असलेल्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या परीक्षा १ जुलै ते १५ जुलै दरम्यान घेण्यात येतील असं बोर्डाने ठरवलं होतं. त्यानुसार वेळापत्रक देखील जारी केलं होतं. परंतु विद्यार्थी आणि पालकांनी आरोग्याच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करत चिंता व्यक्त केली होती.
हेही वाचा - CBSE चा बारावीचा निकाल जाहीर, 'असा' पाहा ऑनलाईन
कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्र, दिल्ली, ओदिशा सारख्या राज्यांनी परीक्षा घेण्यास असमर्थतता दाखवल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. अखेर दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना ठराविक सूत्रानुसार गुण देऊन निकाल लावण्यात येतील, असं बोर्डाने यावेळी स्पष्ट केलं होतं.
त्याप्रमाणे सोमवारी सीबीएसई बोर्डाच्या बारावी इयत्तेच्या परीक्षेचा निकाल आॅनलाइन जाहीर करण्यात आला. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली. साधारणत: १८ लाख विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले असून त्यांना आपली गुणपत्रिका शाळांमधून तसंच डिजिलॉकरमधूनही पाहता येईल. एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहेत. याबाबतची अधिक माहिती बोर्ड संकेतस्थळाद्वारे जाहीर करेल.
My dear Children, Parents, and Teachers, the results of class X CBSE board examinations will be announced tomorrow. I wish all the students best of luck.👍#StayCalm #StaySafe@cbseindia29
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) July 14, 2020
मनुष्यबळविकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी “माझे प्रिय विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल उद्या जाहीर केले जाणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा,” असं ट्विट करत विद्यार्थ्यांना निकालाची माहिती दिली.
दिल्लीतील सीबीएसई विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल इंटर्नल असेसमेंट, प्रोजेक्ट वर्क आणि असाईनमेंट्सच्या आधारावर जाहीर केले जाणार आहेत.