Advertisement

विद्यार्थ्यांना दिलासा! पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश घेण्याची डेडलाईन वाढवली


विद्यार्थ्यांना दिलासा! पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश घेण्याची डेडलाईन वाढवली
SHARES

गेल्या काही महिन्यांपासून मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचे निकाल चर्चेत आहेत. मात्र हे निकाल विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशामुळे नव्हे, तर ते रखडल्यामुळे चर्चेत आहेत. अनेक डेडलाईन देऊनही सर्व अभ्यासक्रमांचे निकाल लावण्यात विद्यापीठ अपयशी ठरले आहे. त्यामुळे अखेर पद्व्युत्तर अभ्यासक्रमांच्याच प्रवेशासाठीची डेडलाईन विद्यापीठाने वाढवली आहे.

निकाल रखडल्यामुळे पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यात अनेक विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. अनेकांना प्रवेश रद्द होण्याची भीती वाटत होती. काही प्रकरणांमध्ये तर हे प्रवेश रद्दही झाले होते. दरम्यान, सर्व निकाल लागण्यासाठी गणेशोत्सव उजाडण्याची शक्यता विद्यापीठाकडूनच व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पदव्युत्तर प्रवेशाचीच मुदत वाढवून 31 ऑगस्ट करण्यात आल्याचं विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना, निकालांच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

या विद्यार्थ्यांना 22 ऑगस्टपर्यंत गुणपत्रिका सादर करणे आवश्यक होते. मात्र अद्याप एक लाखाहून अधिक प्रश्नपत्रिका अद्याप तपासायच्या शिल्लक असल्यामुळे विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना मूळ उत्तर पत्रिका सादर करता येणार नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन उत्तरपत्रिकांचा पर्यायही उपलब्ध आहे.

दरम्यान, शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येईल असे जाहीर केले आहे. मात्र त्यांच्यावर नक्की कोणती कारवाई केली जाईल? आणि कधी? हे मात्र गुलदस्त्यातच आहे.



हेही वाचा

नवी डेडलाईन नाहीच, निकाल लवकरच लागतील - विनोद तावडे


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा