राज्यातील वैद्यकीय शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने नवं वेळापत्रक जाहीर केलं आहे. मात्र सध्याची कोरोना विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा घेऊ नये. त्याऐवजी या परीक्षा अनुकूल वातावरण निर्माण होताच घेण्यात याव्यात, अशा सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना दिल्या. (dont take medical exams during coronavirus pandemic directs maharashtra medical education minister amit deshmukh)
प्रथम, द्वितीय तसेच तृतीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा. या व अशा सर्व नॉन सर्टिफाइंग परीक्षा पुढील सूचनेपर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात.
अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाला बाधा निर्माण होणार नाही यादृष्टीने अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची इंटर्नशीप सुरू करण्यात यावी. कोविड -१९ चा प्रादुर्भाव कमी होताच या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात व तसं केंद्रीय मंडळाला कळविण्यात यावं.
हेही वाचा - Medical Exams: वैद्यकीय परीक्षांचं वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर होणार
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर. मात्र, सध्या #COVID_19 ची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा न घेता अनुकूल वातावरण निर्माण होताच त्या घेण्यात याव्यात- वैद्यकीय शिक्षण मंत्री @AmitV_Deshmukh pic.twitter.com/KApYgn18rq
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 23, 2020
पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी सध्या कॅम्पस मध्येच असल्यामुळे याबाबत फारशी अडचण येणार नाही. तसंच या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठीची प्रवेश परीक्षा १५ सप्टेंबर रोजी असल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा ठरल्यानुसार वेळेवर घेण्यात याव्यात मात्र कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे ऐनवेळी अडचण निर्माण झाल्यास परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेण्यात यावा, अशा सूचनाही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिल्या आहेत.
याआधी अंतिम वर्षाच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने परीक्षेचं वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर करण्यासोबतच दरवर्षीप्रमाणे दोन पेपरमध्ये एका दिवसाचं अंतर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या यावर्षीच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी पदवीपूर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा १६ जुलैपासून घेण्याचं तात्पुरतं वेळापत्रक विद्यापीठाने याआधी जाहीर केलं होतं.
हेही वाचा - वैद्यकीय परीक्षांबाबतची अनिश्चितता दूर करा- अमित देशमुख