Advertisement

उत्तरपत्रिकांची सुरक्षा वाऱ्यावर, कलिना कॅम्पसमध्ये उत्तरपत्रिकांच्या स्कॅनिंगवेळी आग

आगीच्या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण या ठिकाणी आग लागल्याची घटना यापूर्वीही घडली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका असुरक्षित असल्याचा दावा विद्यार्थी संघटना करत आहेत.

उत्तरपत्रिकांची सुरक्षा वाऱ्यावर, कलिना कॅम्पसमध्ये उत्तरपत्रिकांच्या स्कॅनिंगवेळी आग
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील ग्रीन टेक्नॉलॉजीच्या इमारतीत उत्तरपत्रिकांचं स्कॅनिंग सुरु असताना गुरुवारी अचानक आग लागली. ही आग शॉट सर्किटमुळे लागल्याचं म्हटलं जात आहे. परंतु या घटनेमुळे उत्तरपत्रिकांची सुरक्षा धोक्यात असल्याचं पुढे आलं असून या संपूर्ण प्रकरणाची तातडीनं चौकशी करावी आणि विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सुरक्षित जागी ठेवाव्यात, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे.


कशी लागली आग?

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये ग्रीन टेक्नॉलॉजीच्या इमारतीत उत्तरपत्रिकांचं ऑनलाइन मूल्यांकन होत असल्यानं त्याच्या स्कॅनिंगचं काम सुरु आहे. मात्र गुरुवारी 'पाॅवर बॅकअप' देणाऱ्या दोन यूपीएसला अचानक आग लागली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्त हानी झाली नाही. आगीचं वृत्त समजताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठा अनर्थ टळला.

परंतु या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण या ठिकाणी आग लागल्याची घटना यापूर्वीही घडली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका असुरक्षित असल्याचा दावा विद्यार्थी संघटना करत आहेत.


सिनेट सदस्यांची पाहणी

विद्यापीठात आग लागल्याचं वृत्त समजताच युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे आणि शीतल शेठ यांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण ठिकाणची पाहणी केली. या पहाणीदरम्यान विद्यापीठात ज्या ठिकाणी आग लागली त्याठिकाणी अग्निरोधक यंत्रणा कार्यरत नसल्याची बाब उघडकीस आली आहे. बाजूला असलेल्या इमारतीतून ही यंत्रणा मागवून ही आग विझविण्यात आल्याचं युवासेना सिनेट सदस्य शीतल शेठ यांनी सांगितलं.


विद्यापीठाचं दुर्लक्ष

या ठिकाणी वारंवार अशा प्रकारच्या आगी लागत असूनही विद्यापीठ प्रशासन त्याची दखल घेत नाही. आधी घडलेल्या घटनांची दखल घेण्यात आली असती, तर ही परिस्थीती उद्भवली नसती, असा आरोपही सिनेट सदस्यांनी केला आहे.

या प्रकरणी शुक्रवारी सिनेट सदस्य कुलगुरू सुहास पेडणेकर यांची भेट घेणार असून संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करावी व विद्यापीठात अग्निशामक यंत्रणा लवकरात लवकर बसवावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.


कलिना कॅम्पसमध्ये ग्रीन टेक्नॉलॉजीजवळ लागलेल्या ही आग छोटी असून त्या ठिकाणाहून उत्तरपत्रिका फार दूर होत्या. त्यामुळे विद्यापीठातील सर्व उत्तरपत्रिका सुरक्षित असून त्यांना कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.
- विनोद माळाले, जनसंपर्क अधिकारी



हेही वाचा-

मिठीबाई कॉलेजमध्ये चेंगराचेंगरी, ८ विद्यार्थी जखमी

आयआयटीच्या प्लेसमेंटमध्ये ११२२ विद्यार्थ्यांची नोकरी पक्की



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा