एकाबाजूला लॉ प्रवेशाचा गोंधळ सुरू असताना इंजिनिअरिंग प्रवेशप्रक्रियेतही गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेची दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. ४ ऑगस्टच्या रात्री उशिरा जाहीर झालेल्या यादीत विद्यार्थ्यांना एक कॉलेज, तर रविवारी सकाळी लावलेल्या यादीत विद्यार्थ्यांना भलतंच कॉलेज मिळाल्याचा प्रकार समोर आला. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी विद्यार्थी-पालकांनी सोमवारी तंत्रशिक्षण महासंचालनालयासमोर (डीटीई) एकच गर्दी केली होती.
डिप्लोमा शिक्षण झाल्यानंतर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश दिला जात असूनही प्रवेशप्रक्रिया सध्या ऑनलाइन पद्धतीनं राबवण्यात येत आहे. या प्रवेशप्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी शनिवारी संध्याकाळी ६ वाजता जाहीर करण्यात येणार होती. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळं यादी लवकरच जाहीर होईल, असं विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं.
त्यानंतर शनिवार रात्री दहाच्या दरम्यान इंजिनिअरिंगची यादी जाहीर करण्यात आली. या यादी विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रोव्हिजन अलॉटमेंट देण्यात आल्याचं सांगितलं. अशी अलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळी पुन्हा एकदा यादी पाहिली असता, त्या विद्यार्थ्यांना शनिवारी रात्रीपेक्षा वेगळ्या कॉलेजमध्ये अलॉटमेंट करण्यात आल्यानं त्यांना धक्का बसला. यामुळं सर्व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं.
इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेशप्रक्रियेच्या यादीत काही विद्यार्थ्यांना २ कॉलेज तर काही विद्यार्थ्यांच यादीत नावच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर अालं. या गोंधळाचा फटका जवळपास ६३१ विद्यार्थ्यांना बसल्यानं त्या सर्वांनी डीटीईच्या कार्यालयाबाहेर एकच गर्दी केली होती.
याबाबत युवासेनंनं तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांच्याशी भेट घेतली. त्यावेळी डॉ. अभय वाघ यांनी आपली चूक मान्य करत हा गोंधळ तांत्रिक बाबीमुळं झाल्याचं स्पष्ट केलं. त्याशिवाय ऑऩलाईन प्रवेशप्रक्रिया हाताळणाऱ्या फोर पिलर या कंपनीवर तातडीनं कारवाई करण्याची मागणीही युवासेनेनं डॉ. अभय वाघ यांच्याकडं केली.
हेही वाचा-
'लॉ' शाखेचे आणखी ३ निकाल जाहीर
अकरावी प्रवेशप्रक्रियेत पुन्हा गोंधळ, विद्यार्थ्यांचे आयडी ब्लॉक