Advertisement

बारावी पेपरफुटी प्रकरणाचे मुंबई कनेक्शन, दादरच्या शाळेतील विद्यार्थी ताब्यात

मोबाईलवर प्रश्नपत्रिका सापडलेल्या या विद्यार्थ्यांला नोटीस बजावण्यात आली असून त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे.

बारावी पेपरफुटी प्रकरणाचे मुंबई कनेक्शन, दादरच्या शाळेतील विद्यार्थी ताब्यात
SHARES

बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकणी बुलढाणा येथे पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यात खासगी संस्थेतील दोन शिक्षकांचाही समावेश आहे. तर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबई आणि नगरमधून प्रत्येकी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

मुख्य सूत्रधाराचा अद्याप थांगपत्ता लागलेला नसताना त्याची ओळख पटली असून शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

इयत्ता १२ वीची गणित विषयाची प्रश्नपत्रिका समाजमाध्यमात फुटल्याप्रकरणी प्रारंभी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर तो साखरखेर्डा पोलिसांकडे ४ मार्चला वर्ग करण्यात आला.

पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यातील पाच व्यक्तींचा सहभाग निश्चित झाल्यावर त्यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली.

पाचही आरोपींना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सर्व केंद्र संचालक व ‘रनर’ बदलण्यात आले आहेत.

दुसरीकडे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष ५ चे पथक तपास करत असताना धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचल्याचे निष्पन्न झाले आहे. 

दादरच्या अँटॉनिओ डिसिल्वा हायस्कूलमधील शिक्षिकेच्या तक्रारवरून ताब्यात घेण्यात आलेला मुंबईतील अन्य एक आरोपी अल्पवयीन असल्याचे सूत्रांनी सांगितले. मोबाईलवर प्रश्नपत्रिका सापडलेल्या या विद्यार्थ्यांला नोटीस बजावण्यात आली असून त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे.

शिवाजी पार्क पोलिसांनी याप्रकरणी तीन परीक्षार्थीसह ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. उपायुक्त प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे कक्ष ५ याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचा दावा राज्य मंडळाने केला असला तरी परीक्षा सुरू होण्यापूर्वी जवळपास पाऊण तास विद्यार्थ्यांना मोबाइलवर प्रश्नपत्रिका मिळाल्याचे समोर आले आहे.

परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाइलवर १० वाजून १७ मिनिटांनी प्रश्नपत्रिकेचा काही भाग मिळाल्याचे उघड झाले आहे. 



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा