मुंबई विद्यापीठाच्या लॉ शाखेच्या रखडलेल्या निकालांपैकी तीन निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आले. बॅचलर ऑफ लॉ (एलएलबी) चे सेमिस्टर ६ आणि ४ तसेच मास्टर ऑफ लॉ (एलएलएम) सेमिस्टर ३ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. 'आगामी दहा दिवसांत लॉ चे निकाल जाहीर करण्यात येतील', असे आश्वासन प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी बुधवारी दिले होते. त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शुक्रवारी तीन निकाल जाहीर करण्यात आले असून अद्याप सात निकाल मात्र प्रलंबित आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटूळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅचलर ऑफ लॉ (एलएलबी) च्या सेमिस्टर ६ साठी १७२६ जणांनी परीक्षेचा अर्ज केला होता. त्यापैकी ११७२ जण परीक्षेला बसले होते. या परीक्षेत फक्त ५४६ जण उत्तीर्ण झाले असून ६०६ जण नापास झाले आहेत. तसेच बॅचलर ऑफ लॉ (एलएलबी) च्या सेमिस्टर ४ च्या परीक्षेसाठी १९०३ जणांनी अर्ज केला होता. त्यापैकी १५०७ जण परीक्षेला बसले होते. या परीक्षेत फक्त ८९१ जण उत्तीर्ण झाले असून ६१६ जण अनुउत्तीर्ण झाले आहेत.
मास्टर ऑफ लॉ (एलएलएम) सेमिस्टर ३ च्या परीक्षेसाठी ४४२ जणांनी अर्ज केला होता. त्यापैकी ३६१ जण परिक्षेला बसले होते. या परीक्षेत फक्त ७१ जण उत्तीर्ण झाले असून २०१ जण अनुउत्तीर्ण झाले आहेत.
येत्या काही दिवसांत बॅचलर ऑफ लॉ (एलएलबी) सेमिस्टर ८ आणि १० चे निकाल जाहीर करण्यात येणार असून एम ए इन एंटरटेन्मेंट मीडिया अॅण्ड अॅडव्हर्टाइजमेंट सेमिस्टर १ चे निकालही लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे मुंबई विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा
मुंबई विद्यापीठ टाॅप १०० च्या यादीबाहेर