मुंबई विद्यापीठ आणि निकालाचा घोळ यांचं जणू काही अतूट नातं आहे की काय? असंच आता वाटू लागलं आहे. कारण एकीकडे विद्यापीठात निकालाचा दीक्षांत समारंभ सुरू आहे. तर दुसरीकडे विद्यापीठातच विद्यार्थी आपल्या गुणपत्रिकांसाठी काळ्या फिती लावून धरणे आंदोलन करत असल्याचं चित्र आहे.
गेल्यावर्षी विद्यापीठात मास्टर ऑफ सोशल वर्क (एमएसडब्ल्यू) कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांवर आपल्या गुणपत्रिकांसाठी काळ्या फिती आणि पोस्टर्स दाखवून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. विद्यापीठात हा कोर्स सुरू होऊन 3 सेमिस्टर झाल्या. मात्र त्यातील एकही परीक्षेची गुणपत्रिका अद्याप विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. यासाठी वेळोवेळी कुलगुरूंना अर्ज करूनही उपयोग झाला नसल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
विद्यापीठात नव्याने सुरू झालेल्या एमएसडब्ल्यू या कोर्ससाठी सुरुवातीला नियुक्त केलेले संचालक काही काळापुरतेच होते. कारण 31 जानेवारी रोजी त्यांचा कार्यकाळ संपल्याने ते पदमुक्त झाले. त्यानंतर त्यांची बदली एसएनडीटी महाविद्यालयात झाली. या कोर्सच्या चौथ्या सेमिस्टरसाठी 2 विषय असून सुरुवातीला हे विषय संचालकच शिकवणार होते. पण त्यांच्या बदलीमुळे विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे.
1 फेब्रुवारीपासून अभ्यासक्रमाचे एकही लेक्चर झाले नासल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. राजीव गांधी भवनच्या ज्या नवीन संचालकांना पदभार सोपवण्यात आला पण माझ्या करारनाम्यामध्ये एमएसडब्ल्यू कोर्सचं समन्वय नसल्याचं उत्तर देत त्यांनी आपली जबाबदारी झटकली आहे.
विद्यार्थ्यांनी या साऱ्या भोंगळ कारभाराची तक्रार कुलगुरूंकडे केली असून अद्याप त्यांना उत्तर मिळालेलं नाही. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी विद्यासागर राव आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना पत्रही पाठवला आहे. मात्र उत्तर न मिळाल्याने आपली निराशा झाली असल्याचं या विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे.
विद्यार्थ्यांना वेळेवर गुणपत्रिका द्यायच्या नसतील. त्यांना लेक्चर्स पुरवायचे नसतील तर विद्यापीठाने हा कोर्स का सुरू केला? हा प्रश्न पडला आहे. विशेष म्हणजे आमच्या प्रश्नांची शिक्षणमंत्री आणि कुलगुरूंकडूनही दखल न घेतली जाणे हे गंभीर असून आमच्या शिक्षणाशी खेळ केला जात आहे.
- धीरेन, विद्यार्थी, एमएसडब्ल्यू